Covid-19 Test: मस्तच! आता स्मार्टफोनमधून करू शकता कोरोना चाचणी, मिळेल झटपट अहवाल: जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 08:44 AM 2021-06-25T08:44:03+5:30 2021-06-25T08:52:25+5:30
Covid 19 Test Could be Possible From Your Smartphone: कोरोना विषाणूचं अस्तित्व शोधून काढण्यासाठी संशोधकांनी आता स्वस्त आणि मस्त पद्धतीचा शोध लावला आहे. नेमकी काय आहे ही पद्धत जाणून घेऊयात... कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी सध्या बराच वेळ लागतो. अँटीजन चाचण्यांसारख्या झटपट चाचण्या देखील आता उपलब्ध आहेत. पण त्याहीपेक्षा स्वस्त आणि झटपट अहवाल देणारी एक अनोखी पद्धत संशोधकांनी शोधून काढली आहे.
तुम्ही आता तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून तुमची कोरोना चाचणी करू शकणार आहात. यासंबंधिचं एक खास तंत्रज्ञान संशोधकांनी विकसीत केलं आहे.
ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये संशोधकांनी स्मार्टफोनच्या स्क्रिनचा स्वॅब टेस्टिंगसाठी वापर करुन त्याचं विश्लेषण मोबाइलमध्येच करता येईल असं तंत्रज्ञान विकसीत केलं आहे.
आरटीपीसीआर पद्धतीनं घेतलले नमुने आणि स्मार्टफोनच्या स्क्रीनच्या माध्यमातून घेण्यात आलेले नमुने या दोघांचेही अहवाल अगदी अचूक आल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे भविष्यात स्मार्टफोनच्या माध्यमातून कोरोना चाचणीची पद्धत खूप फायदेशीर ठरू शकते असा संशोधकांचा दावा आहे.
स्मार्टफोनच्या माध्यमातून कोरोना चाचणी अतिशय फायदेशीर ठरू शकते. या पद्धतीतून केवळ काही मिनिटांत तुम्हाला अहवाल प्राप्त होतो आणि यात कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्याची देखील गरज भासत नाही. त्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या देशांसाठी ही चाचणी खूप मदत करणारी ठरेल, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
"कोरोना महामारीच्या काळात इतरांसारखाच मी देखील विशेषत: कमी उत्पन्न असलेल्या देशांबाबत खूप चिंतित होतो. कोरोना चाचणीच्या या नव्या पद्धतीमुळे अशा देशांना खूप मोठा फायदा होईल. इतकंच नव्हे, तर भविष्यात कोरोना महामारीला रोखण्यासाठी देखील या पद्धतीचं मोठं योगदान ठरू शकतं", असं यूपीएल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थलमोलॉजीचे रोद्रिगो यंग म्हणाले.
कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटनं जगभरातील अनेक देशांना पुन्हा एकदा नव्या संकटामध्ये टाकलं आहे. देशात लसीकरण अभियान सुरू असतानाच आता नव्या व्हेरिअंटमुळे डोकेदुखी वाढली आहे.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यास पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढण्याचीही भीती आहे. त्यात कोणतीही लस १०० टक्के प्रभावी नाही असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. अशा काळात कोरोनाच्या चाचण्या अतिशय जलद गतीनं होणं आणि रुग्णांचं निदान तातडीनं होणं गरजेचं आहे.
स्मार्टफोनच्या माध्यमातून तुम्हाला कोरोनाची लागण झालीय की नाही हे जर अगदी काही मिनिटांमध्ये कळणार असेल तर हे नक्कीच खूप मोठं वरदान ठरू शकतं. यातून कोरोनाचा प्रसार रोखण्यास खूप मोठी मदत होऊ शकेल..