समुद्रात कोट्यवधी टन माती टाकून नवं शहर वसवू पाहातोय 'हा' देश; पाहा भन्नाट फोटो! By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 05:59 PM 2021-06-09T17:59:37+5:30 2021-06-09T18:04:18+5:30
समुद्रात मातीचा भराव टाकून नवं शहर उभारल्याची अनेक उदाहरणं जगात आहेत. त्यात मुंबईचंही उदाहरण दिलं जातं. सात बेट एकत्र करुन मुंबई शहराची निर्मिती झाली आहे. पण जगाच्या पाठीवर आता आणखी एक समुद्रावर भराव टाकून शहर निर्माण केलं जातंय. जाणून घेऊयात... समुद्रात कोट्यवधी टन मातीचा भराव टाकून डेन्मार्ककडून एक नवं शहर वसवलं जात आहे. या प्रोजेक्टला डेन्मार्कच्या संसदेकडूनही मंजुरी मिळाली आहे. नव्या शहरात जवळपास ३५ हजार लोकांच्या राहण्याची व्यवस्था होणार आहे. नव्या शहराच्या प्रकल्पाचे फोटो जारी करण्यात आले आहेत.
लिनेटहोम नावाच्या या महाकाय बेटाला रिंग रोड, टनल आणि मेट्रो लाइनच्या माध्यमातून डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन शहराला जोडलं जाणार आहे. या शहराचा भूभाग एकूण एक वर्ग मैल म्हणजेच २.६ वर्ग किलोमीटर इतका असणार आहे. या वर्षाच्या अखेरीस याचं काम सुरू होण्याची शक्यता आहे.
समुद्रात भराव टाकून निर्माण केल्या जाणाऱ्या या शहराबद्दल पर्यावरणवाद्यांचं मत वेगळं आहे. कृत्रिम शहराच्या निर्मितीमुळे नैसर्गिक गोष्टींना पोहोचणाऱ्या धोक्यांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला मोठा विरोधाला सामोरं जावं लागू शकतं. याशिवाय समुद्रात भराव टाकून निर्मिती केली जात असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही खूप काळजी घ्यावी लागणार आहे.
डेन्मार्कमध्ये तयार केल्या जाणाऱ्या या नव्या शहराच्या चारही बाजूंनी एक बांध उभारण्यात येणार आहे. जेणेकरुन समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली किंवा वादळ आलं तरी शहराला याचा धोका निर्माण होणार नाही. नियोजित कार्यक्रमानुसार काम सुरू झालं तर २०३५ पर्यंत नव्या शहराचा बहुतांश भाग तयार झालेला असेल. तर २०७० पर्यंत सर्व सोयी-सविधांनी सज्ज असलेलं हे शहर पूर्ण होईल.
युरोपीयन न्यायालयामध्ये या नव्या शहराच्या निर्मितीविरोधात पर्यावरणवाद्यांनी याचिका देखील दाखल केली आहे. नव्या शहराच्या निर्मितीला सुरुवात झाली तर दैनंदिन पातळीवर किमान ३५० ट्रक कोपेनहेगन येथून वाहतूक करतील. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या तर वाढेलच पण प्रदुषणातही मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार नव्या शहराचा आकार जवळपास ४०० फुटबॉल स्टेडियम मावतील इतका आहे. ज्यासाठी किमान ८ कोटी टन मातीचा भराव टाकण्याची आवश्यकता आहे.
डेन्मार्कच्या संसदेत नव्या शहराच्या निर्मितीच्या विधेयकाला ८५ मतं होकारासाठी मिळाली. तर १२ मतं ही प्रकल्पाच्या विरोधात होती. त्यामुळे बहुमताच्या पातळीवर नव्या शहराच्या निर्मितीचं विधेयक मंजुर करण्यात आलं आहे.
डेन्मार्क सरकारच्या दाव्यानुसार नव्या शहराचा प्रकल्प हा आजवरचा सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे. देशाच्या इतिहासात याची नोंद सुवर्णाक्षरांमध्ये होणार आहे, असा दावा सरकारनं केला आहे.
पर्यावरणवादी आणि प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये नव्या शहराच्या निर्माणासाठी मुख्य शहरातून होणाऱ्या कच्च्या मालाच्या ने-आणाबाबत आक्षेप घेण्यात आला आहे. पण यासाठी पर्याय देखील उपलब्ध आहेत, असं डॅनिश रस्ते माल वाहतूक विभागाच्या प्रमुख कॅरीना ख्रिस्टिनसन यांनी सांगितलं.