विमानातून बॉम्बफेक करून ट्रम्प यांना ठार मारण्याचा इराणचा कट?; 'त्या' ट्विटनं एकच खळबळ

By कुणाल गवाणकर | Published: January 22, 2021 08:44 PM2021-01-22T20:44:43+5:302021-01-22T20:49:06+5:30

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात इराण मोठा कट रचत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. इराणकडून करण्यात आलेल्या एका ट्विटमुळे याबद्दलच्या चर्चेला उधाण आलं आहे.

इराणनं पुन्हा एकदा बदल्याची भाषा केली आहे. इराणमधील तस्नीम नावाच्या वृत्तसंस्थेनं एक फोटो ट्विट केला आहे. त्यात डोनाल्ड ट्रम्प गोल्फ खेळताना दाखवण्यात आले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प खेळत असलेल्या गोल्फ मैदानावर बी-२ या अणूबॉम्ब फेकू शकणाऱ्या विमानाची सावली दिसत आहे.

इराणी लष्कराचे जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा आदेश देणाऱ्यांचा बदला घेऊ, असा सूचक इशारा ट्विट करण्यात आलेल्या फोटोसह देण्यात आला आहे.

बी-२ बॉम्बरच्या छायेत डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो प्रसिद्ध करणाऱ्या तस्नीम वृत्तसंस्थेनं 'बदला घेणं अनिवार्य आहे' असं शीर्षकात म्हटलं आहे.

इराणी लष्कराचे टॉप कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी इराणमधील सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खोमेनेई यांनी डिसेंबरमध्ये दिली होती.

अमेरिकेचे अध्यक्ष असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येचे आदेश दिले होते.

३ जानेवारी २०२० रोजी एका ड्रोन हल्ल्यात अमेरिकी सैन्यानं सुलेमानी यांची हत्या केली. सुलेमानी बगदादमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कारनं निघाले असताना त्यांची हत्या करण्यात आली.

अमेरिकेनं सुलेमानी यांची हत्या केल्यानंतर इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेले. इराणनं इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले.

ट्रम्प यांच्या अटकेसाठी इराणनं काही दिवसांपूर्वी इंटरपोलची मदत मागितली. ट्रम्प यांच्यासह अमेरिकेच्या ४७ अधिकाऱ्यांविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करा, अशी मागणी इराणनं केली आहे.