Corona Vaccine: “आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबळींपैकी ९९.२ टक्के लस न घेतलेले”: डॉ. अँथनी फाउची

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 04:35 PM2021-07-07T16:35:18+5:302021-07-07T16:39:50+5:30

Corona Vaccine: अमेरिकेत आतापर्यंत एकूण ६ लाख २१ हजार नागरिकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.

गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोना विषाणू संसर्गाने धूमाकूळ घातला आहे. पहिल्या लाटेनंतर दुसरी, मग तिसरी काही देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट असल्याचे सांगितले जात आहे.

भारतासह जगभरातील बहुतांश देशांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठाच तडाखा बसल्याचे पाहायला मिळाले. अनेक देशांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनसह कठोर निर्बंध लावले.

आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या जवळपास ४० लाखांवर गेली आहे. भारतात कोरोनाबळींची संख्या ४ लाख आहे. अमेरिकेत सर्वाधिक नागरिकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

अमेरिकेतील विशेषज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी यासंदर्भात काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी ९९.२ टक्के लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नव्हती, असे डॉ. फाउची यांनी म्हटले आहे.

अमेरिकेत आतापर्यंत एकूण ६ लाख २१ हजार नागरिकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या ४० लाख असल्याचे सांगितले जात आहे.

हे मृत्यू खूपच निराशाजनक आहेत. कारण ते टाळता आले असते, असे डॉ. अँथनी फाउची यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. कोरोनाच्या रुपातील धोकादायक शत्रू आपल्यासमोर असताना आणि त्याच्यावरील गुणकारक उपाय असतानाही दुर्दैवीपणे त्यांची अमलबजावणी होत नाही हे निराशाजनक आहे, असे ते म्हणाले.

पर्याप्त लसीचे डोस उपलब्ध असल्याने अमेरिका भाग्यवान आहे. अमेरिकेतील सर्व लोकांचे लसीकरण होऊ शकते इतके डोस उपलब्ध आहेत, असे सांगत डॉ. अँथनी फौची यांनी लोकांना करोना हा प्रत्येकाचा शत्रू आहे हे समजून घ्या अशी विनंती केली आहे.

दरम्यान, भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे. आयसीएमआरच्या एका अभ्यासातून समोर आले आहे की, जर कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, तर मृत्यूचा धोका ९५ टक्क्यांपर्यंत कमी होतो.

पोलीस दलातील ०१ लाख १७ हजार ५२४ कर्मचाऱ्यांच्या आधारे हा अभ्यास करण्यात आला. या दरम्यान लस घेतलेले जवान आणि लस न घेतलेले जवान यांच्यापैकी किती जणांचा कोरोनाने मृत्यू झाला याबद्दल निरीक्षण करण्यात आले.

कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी लस प्रभावी आहे. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी लसीचा एक डोस घेतला होता, त्यांना मृत्यूचा धोका ८२ टक्क्यांपर्यंत कमी होता, तर दोन्ही डोस घेतलेल्यांना हा धोका ९५ टक्क्यांपर्यंत कमी होता, असे सांगितले गेले आहे.