Durand Line Explained : काय आहे "ड्युरंड लाइन"? ज्यामुळे तालिबान पाकिस्तानला देतोय युद्धाची धमकी... By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 07:12 PM 2021-12-23T19:12:26+5:30 2021-12-23T20:15:47+5:30
तालिबानचे गोडवे गाणाऱ्या पाकिस्तानची चिंता वाढली आहे. अफगाणिस्तानातील तालिबान सरकार ड्युरंड लाइनला मानायला तयार नाही. यामुळे आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आमने-सामने आले आहेत. जाणून घ्या काय आहे ड्युरंड लाइन आणि कशामुळे झालाय वाद. काबुल: तालिबान आणि पाकिस्तानमधील ड्युरंड रेषेवरून वाद वाढत चालला आहे. तालिबानने अफगाण सीमेवर पाकिस्तानने केलेल्या कुंपणावर तीव्र आक्षेप व्यक्त करत युद्धाची धमकी दिली आहे. तालिबानला सुरुवातीपासूनच पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील सीमा असलेल्या ड्युरंड लाइनला मान्यता नाही.
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार? अफगाणिस्तानचे क्षेत्र सध्याच्या सीमेच्या पलीकडे असल्याचा दावा पाकने केला आहे. हा एकमेव मुद्दा आहे ज्यावर अफगाणिस्तानचे माजी नागरी सरकार आणि तालिबान यांच्यात सहमती होती. तालिबानने ड्युरंड रेषेवरील पाकिस्तानचे कुंपणही पाडले आहे. अशा परिस्थितीत तालिबानचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून जगाकडून देणग्या मागणाऱ्या इम्रान खानच्या अडचणी आणखी वाढणार, हे निश्चित.
तालिबानने स्पष्ट केली भूमिका-अफगाणिस्तानातील बहुसंख्य पश्तून आणि तालिबान यांनी कधीही ड्युरंड रेषेला अधिकृत सीमारेषा मानली नाही. तालिबानचा सर्वोच्च प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिदने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर लगेचच सांगितले की, नवीन अफगाण सरकार या विषयावर आपली भूमिका जाहीर करेल.
नागरिकांना सुरक्षित वातावरण हवय-पाकिस्तानने बनवलेल्या कुंपणामुळे लोक वेगळे झाले आहेत आणि कुटुंबे विभक्त झाली आहेत, असा दावा त्यांनी केला होता. आम्हाला सीमेवर सुरक्षित आणि शांततापूर्ण वातावरण निर्माण करायचे आहे, त्यामुळे अडथळे निर्माण करण्याची गरज नाही, असे तालिबानकडून सांगण्यात आले होते.
कधी तयार झाली ड्युरंड लाइन? ड्युरंड लाइन हा 19व्या शतकातील रशियन आणि ब्रिटीश साम्राज्यांमधील ग्रेट गेमचा वारसा आहे. तत्कालीन भयभीत ब्रिटीश साम्राज्याने पूर्वेकडील रशियन विस्तारवाद टाळण्यासाठी अफगाणिस्तानचा बफर झोन म्हणून वापर केला. 12 नोव्हेंबर 1893 रोजी ब्रिटिश नागरी सेवक सर हेन्री मॉर्टिमर ड्युरंड आणि तत्कालीन अफगाण शासक अमीर अब्दुर रहमान यांच्यात ड्युरंड लाइनवर स्वाक्षरी झाली होती.
ड्युरंड लाइन कशी तयार झाली? दुसरे अफगाण युद्ध संपल्यानंतर दोन वर्षांनी 1880 मध्ये अब्दुर रहमान यांना अफगाणिस्तानचा राजा म्हणून नियुक्त करण्यात आले. या युद्धात ब्रिटिश सैन्याने अफगाणिस्तान राज्याचा मोठा भाग ताब्यात घेतला होता. अब्दुर रहमानला इंग्रजांनी स्वतःच्या इच्छेने राजा बनवले होते. त्यानंतर 1893 मध्ये सर ड्युरंड यांच्याशी झालेल्या कराराने भारतासोबतच्या अफगाण सीमेवरील त्यांच्या आणि ब्रिटीश भारताच्या प्रभावक्षेत्राच्या सीमा निश्चित केल्या. तेव्हा आताचा पाकिस्तानही भारताचा भाग होता.
लाइन चीनपासून इराणपर्यंत पसरलेली आहे- सात-विभागांच्या कराराने तत्कालीन ब्रिटिश भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान 2,670 किमी लांबीची रेषा ठरली होती. Durand's Curse: A Line Across the Pathan Heart चे लेखक राजीव डोग्रा यांच्या म्हणण्यानुसार, ड्युरंडने अमीरसोबतच्या संभाषणात अफगाणिस्तानच्या छोट्या नकाशावर ही रेषा रेखाटली होती. ड्युरंड रेषा चीनच्या सीमेपासून इराणपर्यंत पसरलेली आहे.
पश्तूनांचा आक्षेप काय आहे? पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळ राहणाऱ्या पश्तूनांचा आरोप आहे की या रेषेमुळे त्यांची घरे फुटली आहेत. त्या भागात गेली शंभर वर्षे ते त्यांच्या कुटुंबियांसह व जमातींसह राहत होते, पण ब्रिटिशांनी पश्तूनबहुल भागातून ही रेषा आखून दिली. परिणामी पश्तून दोन देशांमधील भिंतीत कैद झाले.