आर्थिक संकट, पाकिस्तान पुन्हा चीनपुढे हात पसरण्याच्या तयारीत; घेणार ३ अब्ज डॉलर्सचं कर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 08:23 PM2022-01-31T20:23:32+5:302022-01-31T20:33:45+5:30

अनेकदा कर्जासाठी हात पसरणाऱ्या पाकिस्ताननं पुन्हा एकदा आर्थिक चणचणीच्या नावाखाली चीनकडे कर्ज मागण्यासाठी तयारी सुरू केलीये.

आर्थिक संकटाचा सामना करत असलेला पाकिस्तान (Pakistan) चीनकडून (China) तीन अब्ज डॉलर्सचे कर्ज घेण्याच्या प्रयत्नात आहे. पुढील आठवड्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांच्या चीन दौऱ्यात या कर्जावर सहमती होऊ शकते.

पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, इम्रान खान ३ फेब्रुवारीला चीनची राजधानी बीजिंगला भेट देणार आहेत. यादरम्यान ते चीनच्या प्रमुख नेत्यांचीही भेट घेणार आहेत.

'द एक्सप्रेस ट्रिब्यून'नं आपल्या बातमीत पाक सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. इम्रान खान यांच्या या भेटीदरम्यान चीन आणखी तीन अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर करू शकतो, असे सांगण्यात आले आहे. चीनने यापूर्वीच पाकिस्तानला ११ अब्ज डॉलरचे कर्ज दिले आहे.

गेल्या आर्थिक वर्षात पाकिस्तानने चीनला २६ अब्ज पाकिस्तानी रुपये व्याज म्हणून दिले आहेत. याशिवाय सहा प्राधान्य क्षेत्रांमध्ये चीनची गुंतवणूक आकर्षित करण्याचाही पाकिस्तानचा प्रयत्न आहे.

"आम्ही कापड, फुटवेअर, फार्मा, फर्निचर, कृषी, ऑटोमोबाईल आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात चीनकडून गुंतवणूक मिळवण्याचा प्रयत्न करू," असे पाकिस्तान गुंतवणूक मंडळाचे प्रमुख अजफर अहसान म्हणाले.

यासाठी पाकिस्तान चीनच्या सुमारे ७५ कंपन्यांना पश्चिम आशिया, आफ्रिका आणि जगाच्या इतर भागांमध्ये व्यापार मार्ग उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही देण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक आणि मजुरीचा खर्च कमी होईल.

चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर अथॉरिटी सक्रिय झाल्यानंतर सरकारने विदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी ही क्षेत्रे ओळखली असल्याचे फेडरल नियोजन आणि विकास मंत्री असद उमर यांनी सांगितले.

तर दुसरीकडे गेली कित्येक दशके काश्मीर, काश्मीर असा जप करत दहशतवाद्यांवर अब्जावधी डॉलर्स उधळणाऱ्या पाकिस्तानला भिकेला लागल्य़ावर अक्कल आली. कर्जाच्या ओझ्याखाली आणि महागाईच्या विळख्यात पुरता कंगाल झालेल्या पाकिस्तानी नेत्यांनी आता परराष्ट्र नीती ठरविली आहे. यामध्ये पाकिस्तान शेजारी देशांशी शांतता आणि आर्थिक कूटनीतीला प्राधान्य देणार असल्याचे म्हटले आहे.

१०० पानांच्या या राष्ट्रीय सुरक्षा नीतीमध्ये भारतासोबत काश्मीरमुद्द्यावर अंतिम तोडगा काढत व्यापार आणि व्यवसायीक नात्याला पुढे नेले जाईल. दोन्ही देशांमध्ये दहशतवाद आणि काश्मीरवरून तणाव आहे. यामुळे व्यापारी आणि आर्थिक संबंध खराब झाले आहेत.

एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने एक्‍सप्रेस ट्रिब्‍यूनला मुलाखत देताना म्हटले की, आम्ही पुढील १०० वर्षे तरी भारतासोबर दुष्मनी करणार नाही. ही नवीन नीती शेजारी देशांशी शांतता राखण्यावर आहे. जर काश्मीर मुद्द्यावर चर्चा आणि प्रगती झाली तर भारतासोबत पूर्वीसारखे व्यापारी संबंध होण्याची शक्यता आहे.