'या' महिला कॅप्टनवर लागला सुएझ कालव्यात जहाज अडकवल्याचा आरोप, तिनेच केला याचा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 11:28 AM2021-04-05T11:28:58+5:302021-04-05T11:36:26+5:30

२९ वर्षीय शिप कॅप्टन मारवा सुलेहदोरने (Marwa Elselehdar) इंटरनेट वर अशा काही बातम्या वाचल्या ज्यात म्हटले होते की, सुएझ कालव्यात एवरविगेन शिप मारवामुळे अडकलं होतं.

काही दिवसांपूर्वी एवरगिवेन नावाचं एक भव्य जहाज सुएझ कालव्यात अडकलं होतं. जे मोठ्या प्रयत्नांनंतर बाजूला करण्यात आलं. यामुळे जगातील सर्वात मोठा समुद्री व्यापारी मार्ग बंद झाला होता आणि अब्जो रूपयांचं नुकसान झालं होतं. अशात या प्रकरणी इजिप्तची पहिली महिला जहाज कॅप्टनसाठी अडचणी वाढल्या आहेत. (All Image Credit : Marwa Elselehdar Instagram)

२९ वर्षीय शिप कॅप्टन मारवा सुलेहदोरने इंटरनेट वर अशा काही बातम्या वाचल्या ज्यात म्हटले होते की, सुएझ कालव्यात एवरविगेन शिप मारवामुळे अडकलं होतं. मात्र, मारवा तर त्यावेळी सुएझ कालव्यापासून अनेक किलोमीटर दूर एलेक्झांड्रियामध्य आएडा-फोर नावाच्या जहाजात फर्स्ट मेट म्हणून काम करत होती.

इंटरनेटवरील या काही बातम्यांमध्ये सांगण्यात आले होते की, सुएझ कालव्यात झालेल्या घटनेत मारवा सहभागी आहे आणि तिचे इन्स्टाग्राम फोटो एडीट करून बातम्यांमध्ये पोस्ट केले होते. रिपोर्टनुसार, ही बातमी सर्वातआधी अरब न्यूज नावाच्या वेबसाइटने दिली होती.

बीबीसीसोबत बोलताना मारवाने सांगितले की, फेक न्यूज इंग्रजीमध्ये होती. त्यामुळे ती अनेक देशांमध्ये वेगाने पसरली. या न्यूजमुळे माझ्या प्रतिष्ठेला ठेच लागली आहे. त्यामुळे मी या बातम्यांचं सतत खंडन करत होते. तिला यावरून निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कमेंट आल्या. ज्याने तिची हिंमत वाढली.

ती म्हणाली की, 'मला वाटतं की, मला या पूर्ण प्रकरणात टार्गेट केलं गेलं. कारण या क्षेत्रात मी एक यशस्वी महिला आहे आणि मी इजिप्तमधून आहे. पण मी हे स्पष्टपणे सांगू शकत नाही की, ही फेक बातमी पसरवण्याामागचा उद्देश काय असेल. मारवा सांगते की, तिला नेहमीच समुद्रावर प्रेम आहे.

मारवाने सांगितले की, जेव्हा तिच्या भावाने एएएसटीएमटीमध्ये अॅडमिशन घेतली तेव्हा तिलाही मर्चंट नेव्हीत जाण्याचा प्रेरणा मिळाली. पण त्यावेळी या इंडस्ट्रीत पुरूषांनाच प्रवेश मिळत होता. तरी सुद्धा मारवाने अर्ज केला आणि इजिप्तच्या राष्ट्रपतींच्या समीक्षेनंतर तिला प्रवेश मिळाला.

मारवा पुढील महिन्यात एक फायनल परीक्षा देणार आहे. ज्यानंतर तिला कॅप्टनची पूर्ण रॅकिंग मिळेल. तिला स्वत:ला पुरूष प्रधान इंडस्ट्रीमध्ये महिलांसाठी एक रोल मॉडल म्हणून समोर आणायचं आहे. ती सांगते की, निगेटिव्ह विचार बाजूला सारून आपल्या कामावर फोकस करा.

दरम्यान, याआधीही मारवाने या पुरूष प्रधान इंडस्ट्रीत अनेक अडचणींचा सामना केला आहे. इंटरनॅशनल मेरीटाइम ऑर्गनायझेशनची आकडेवारी पाहिली तर जहाजांवर काम करणाऱ्यांमध्ये केवळ २ टक्के महिला आहेत.