afghanistan crisis: अफगाणिस्तानवर नवं संकट! खतरनाक IS कडून काबुल विमानतळावर हल्ल्याची शक्यता, अमेरिकेनं दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 09:02 AM2021-08-22T09:02:57+5:302021-08-22T09:09:05+5:30

afghanistan crisis: अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. आता आणखी एक संकट अफगाणिस्तानातील नागरिकांसमोर उभं ठाकलं आहे.

तालिबान्यांनी देशावर कब्जा केल्यानंतर अफगाणी नागरिक मिळेल त्यामार्गानं देश सोडून जाण्यासाठी धावपळ करत आहेत. यातच आता अमेरिकेनं अफगाणिस्तानला एक इशारा दिला आहे.

अफगाणिस्तानातील अमेरिकी नागरिकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. काबुल विमानतळावर इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेकडून हल्ला केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे अमेरिकेनं आपल्या नागरिकांसाठी अलर्ट जारी केला आहे.

काबुल विमानतळावर गेल्या काही दिवसांपासून मोठा गोंधळ सुरू आहे. देश सोडून जाण्यासाठी हजारो नागरिक काबुल विमानतळाबाहेर गर्दी करून आहेत आणि नियंत्रण करण्यासाठी अमेरिकेचे सैन्य काबुल विमानतळावर आहे.

काबुल विमानतळावरील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. अशातच अमेरिकेनं अफगाणिस्तानातील आपल्या नागरिकांना काबुल विमानतळावर येण्यास पूर्णपणे मनाई केली आहे. सध्या काबुल विमानतळावर अमेरिकन सैन्याचं पूर्णपणे नियंत्रण आहे.

काबुल विमानतळाबाहेरील गेटवर गर्दी करणं टाळण्याचे निर्देश अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिले आहेत. तालिबाननं काबुलला पूर्णपणे वेढा घातला आहे. तर काबुल विमानतळावर अमेरिकन सैन्याचा ताबा आहे. अशा परिस्थितीत काबुल विमानतळावर हल्ला होऊ शकतो, असं कयास व्यक्त केला जात आहे.

काबुल विमानतळाच्या सुरक्षेसाठी विमानतळाच्या चारही बाजूंना वॉच टॉवर तयार करण्यात आले आहेत. यासोबतच गर्दी कमी करण्यासाठी अमेरिकन सैन्य प्रयत्न करत आहे. मोठ्या प्रमाणात सशस्त्र सैनिक तैनात करण्यात आले आहेत.

अफगाणिस्तानच्या राजधानीच्या बाहेर डोंगराळ भागात असलेल्या या विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

विमानतळावरुन उड्डाण घेण्यासाठीच्या टर्मिनलपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना आपल्या सामनासकट स्क्रीनिंक पॉईंटपर्यंत जावं लागतं. यातलं अंतर खूप आहे. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. यातच विमानतळावर हल्ला झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.

Read in English