CoronaVirus: ठणठणीत बऱ्या झालेल्या ५१ जणांवर कोरोनाचा पलटवार; जगाच्या चिंतेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 05:23 PM2020-04-07T17:23:28+5:302020-04-07T17:31:51+5:30

चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनानं हजारो जणांचा बळी घेतला आहे. अनेक बलाढ्य देश कोरोनासमोर गुडघे टेकत असताना दक्षिण कोरियानं मात्र कोरोना नियंत्रणात आणला.

कोरोना आटोक्यात आणणाऱ्या दक्षिण कोरियाचं अनेकांनी कौतुक केलं. मात्र कोरियाच्या चिंतेत वाढ झाली आहे. याशिवाय जगातल्या इतर देशांची डोकेदुखीदेखील वाढली आहे.

कोरोनावर उपचार घेऊन घरी गेलेल्या ५१ रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं डेगू शहरात ५१ जणांना क्वॉरेंटाईन करण्यात आलं होतं. यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दोन तपासण्या निगेटिव्ह आल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं.

क्वॉरेंटाईनमधून घरी सोडण्यात आलेल्या ५१ जणांना पुन्हा कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

कोरोनाचा विषाणू अनेकदा मानवी शरीरात लपून बसतो. त्यामुळे त्याचा शोध घेणं अवघड असतं, अशी माहिती दक्षिण कोरियाच्या आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांनी दिली.

बऱ्या झालेल्या व्यक्तींना दुसऱ्या व्यक्तींकडून कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. तर त्यांच्या शरीरात लपून बसलेला कोरोनाचा विषाणू पुन्हा सक्रिय झाल्याचं दक्षिण कोरियाच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध विभागानं म्हटलं आहे.

ब्रिटनमधल्या तज्ज्ञांचं मत वेगळं आहे. माणसाच्या शरीरात कोरोनाचा विषाणू लपून बसतो आणि तो पुन्हा सक्रिय होतो, याबद्दलची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही, असं ब्रिटनमधल्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

क्वॉरेंटाईनमधून घरी सोडताना केलेल्या तपासण्या सदोष असाव्यात, अशी शक्यता ब्रिटनच्या ईस्ट एन्गलिया विद्यापीठाचे प्राध्यापक पॉल हंटर यांनी व्यक्त केली.

कोरोनाची चाचणी करणाऱ्या टेस्ट किट सदोष असल्यानं रुग्ण निगेटिव्ह असल्याचा अहवाल आला असावा, असं हंटर म्हणाले. कोरोना टेस्ट किटकडून तपासणी करताना चूक होण्याची शक्यता २० ते ३० टक्के इतकी असू शकते, अशी माहिती त्यांनी दिली.

दक्षिण कोरियात आतापर्यंत कोरोनाचे १० हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १९२ जणांना जीव गमवावा लागला आहे.