G4 Swine Flu Not New Not Infect Humans Easily Says China
डुकरांमध्ये सापडलेला नवा व्हायरस किती धोकादायक?; चीनच्या यू-टर्ननं पुन्हा वाढवली जगाची चिंता By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 09:05 AM2020-07-05T09:05:47+5:302020-07-05T09:10:01+5:30Join usJoin usNext चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना विषाणूनं जगभरात थैमान घातलं असून आतापर्यंत १ कोटी १३ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सव्वा पाच लाखांपेक्षा अधिक आहे. जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेसह बहुतांश देश सध्या कोरोना संकटाचा सामना करताना दिसत आहेत. भारतातही दिवसागणिक कोरोनाचं संकट वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्येत अतिशय झपाट्यानं वाढ होत आहे. संपूर्ण जग कोरोनाचा मुकाबला करत असताना चीनमध्येच आणखी एक विषाणू सापडल्याची माहिती समोर आल्यानं सगळ्यांची चिंता वाढली. डुकरांमध्ये हा विषाणू सापडला असून त्याला जी-४ असं नाव देण्यात आलं आहे. डुकरांमध्ये सापडलेला विषाणूची लागण माणसाला होऊ शकते, अशी माहिती काही दिवसांपूर्वीच एका अमेरिकन नियतकालिकानं प्रसिद्ध केली. विशेष म्हणजे चिनी शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाच्या आधारेच ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली. जी-४ विषाणू माणसांसाठी अधिक धोकादायक असून तो माणसांमध्ये लवकर संक्रमित होतो. त्यामुळे यामुळे आणखी एक महामारी येऊ शकते, असा धोक्याचा इशारा अमेरिकन नियतकालिकानं दिला होता. त्याला चिनी शास्त्रज्ञांच्या संशोधनाचा आधार होता. अवघ्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात झालेल्या या माहितीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण जी-४ विषाणू नवा नसून तो सहज माणसाच्या शरीरात संक्रमित होत नाही, अशी नवी माहिती चीनच्या कृषी मंत्रालयानं दिली आहे. जी-४ विषाणू आणि त्याच्या संक्रमणाबद्दल प्रसिद्ध झालेली माहिती अतिशय कमी पुराव्याच्या आधारे देण्यात आल्याचा दावा आता चिनी कृषी मंत्रालयानं केला आहे. अतिशय कमी नमुन्यांचा अभ्यास करून निष्कर्ष काढण्यात आल्याचा आक्षेपही त्यांनी नोंदवला आहे. जी-४ विषाणूचा वराह पालन उद्योग आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यासाठी एका सेमिनारचं आयोजन केल्यानंतर याबद्दलचे निष्कर्ष काढण्यात आल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली. जी-४ विषाणूबद्दलच्या अभ्यासासाठी आयोजित करण्यात आलेल्या सेमिनारला पशू चिकित्सक आणि अँटी व्हायरस तज्ज्ञ उपस्थित होते. जी-४ विषाणू नवा नसल्याची माहिती सेमिनारनंतर चिनी कृषी मंत्रालयानं दिली. जागतिक आरोग्य संघटना आणि चीनमधील आरोग्यविषयक यंत्रणा यावर लक्ष ठेवून असल्याचंही मंत्रालयानं सांगितलं.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus