संशयास्पद मृत्यूपूर्वी कोरोना संक्रमित होता जॉर्ज फ्लॉईड, रिपोर्टमधून खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 08:14 PM 2020-06-04T20:14:11+5:30 2020-06-04T23:24:57+5:30
जॉर्ज फ्लॉईडविषयी आणखी एक खुलासा झाला आहे, तो म्हणजे, त्याला एप्रिलमध्ये कोरोना विषाणूची लागणही झाली होती. कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉईडच्या संशयास्पद मृत्यूनंतर अमेरिकेत हिंसाचार उफाळून आला होता. अनेक ठिकाणी वारंवार निदर्शने होत आहेत.
पोलीस कोठडीत हा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले. दरम्यान, जॉर्ज फ्लॉईडविषयी आणखी एक खुलासा झाला आहे, तो म्हणजे, त्याला एप्रिलमध्ये कोरोना विषाणूची लागणही झाली होती.
मिनियापोलिसमध्ये पोलीस कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या जॉर्ज फ्लॉईडचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट बुधवारी जाहीर झाला. फ्लॉईडला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले.
हेनेपिन काउंटी वैद्यकीय परीक्षक कार्यालयाने फ्लॉईड कुटुंबाच्या परवानगीनंतर 20 पानांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, फ्लॉईडला एप्रिलमध्ये संसर्ग झाल्याचे आढळले होते. परंतु त्याला या आजाराची कोणतीही लक्षणे नव्हती.
फ्लॉईडच्या फुफ्फुसाला कोरोना संसर्ग झाल्याचेही सांगितले जात असले तरी त्याच्या मृत्यूमागे कोरोना संसर्ग असल्याचे कोणतेही संकेत मिळाले नव्हते.
त्याने बनावट नोटांच्या माध्यमातून दुकानातून सामान खरेदी करण्याचा प्रयत्न केला, असा ठपका ठेवत त्याला अटक करण्यात आली होती.
जॉर्ज फ्लॉईडला 25 मे रोजी मिनियापोलिसमधील दुकानाबाहेर पोलिसांनी अटक केली होती. यानंतर जेलमध्येच त्याचा संशयास्पद मृत्यू झाला.अटकेच्या दिवशी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये त्याला एका श्वेतवर्णीय पोलीस अधिकाऱ्यानं अटक केल्याचं दिसत होते.
मृत्यूनंतर जॉर्जच्या गळ्यावर काही जखमा सापडलेल्या असून, पोलीस अधिकाऱ्यांवर त्याचा हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. फ्लॉईड याच्या मृत्यूची झळ अमेरिकेतल्या 140 शहरांना बसली.
गेल्या काही दशकांमधील अशांततेची ही मोठी घटना आहे. यावर व्हाईट हाऊसने सांगितले की, हिंसा, अराजकता आणि अव्यवस्थेला सहन केले जाऊ शकत नाही.
व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव केली मॅकनेनी यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्षांनी रस्त्यावर दिसत असलेलं दृश्य मान्य नसल्याचं सांगितलंय. हे गुन्हेगारी कृत्य आहे. ही वृत्ती निरपराध अमेरिकी नागरिकांना नुकसान पोहोचवत आहे.
शेकडो लोकांनी व्हाईट हाऊसच्या बाहेर निदर्शने करण्यास सुरुवात केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बंकरवर ठेवावे लागले होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीसुद्धा या घटनेचा निषेध नोंदवला होता.