कोरोना रिटर्न्स : जगात झपाट्याने वाढतायेत प्रकरणे; 'या' देशांमध्ये सर्वाधिक कोरोनाचा प्रभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 11:06 AM2022-03-30T11:06:06+5:302022-03-30T11:18:38+5:30

Corona Pandemic : आशियापासून (Asia) ते पाश्चात्य देशांमध्ये (Western Countries) पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे.

लंडन : कोरोना महामारी (Corona Pandemic) पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या काही महिन्यापासून कोरोना संसर्गाची प्रकरणे कमी दिसून येत होती. मात्र आता पुन्हा कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत.

आशियापासून (Asia) ते पाश्चात्य देशांमध्ये (Western Countries) पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाबाबत निष्काळजीपणा त्रासदायक ठरू शकतो, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.

WION मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ओमायक्रॉनचे (Omicron) अधिक संसर्गजन्य BA.2 व्हेरिएंट युरोप आणि चीनच्या काही भागांमध्ये वेगाने पसरत होते. मार्चमध्ये येथे अनेक नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे.

चीनचे शांघाय शहर एक नवीन हॉटस्पॉट म्हणून समोर आले आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन(Lockdown) लागू केला आहे.

या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये फ्रान्स, इटली, जर्मनी आणि ब्रिटनमध्येही कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. त्याचबरोबर अमेरिकेत 'कोरोना रिटर्न'चा इशाराही दिला जात आहे.

सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने जोर पकडला आहे. चीनच्या वुहानमधून या महामारीची सुरुवात झाली आणि त्यानंतर त्याने संपूर्ण जगाला वेठीस धरले.

शांघायमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची जवळपास 5,982 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शहराच्या पश्चिमेकडील काही भागात लॉकडाऊनही लागू केला आहे.

यापूर्वी लॉकडाऊनची शक्यता प्रशासनाने फेटाळून लावली होती. 26 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या या शहराला सध्या लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे.

ओमायक्रॉनच्या संसर्गादरम्यान ब्रिटिश आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्वात आधी BA.2 च्या वाढत्या प्रकरणाचा शोध लावला होता. ओमायक्रॉनचे BA.1, BA.2 आणि BA.3 असे एकूण तीन सब-स्ट्रेन आहेत. BA.2 ला 'स्टेल्थ व्हेरिएंट' म्हणूनही ओळखले जाते, कारण ते ट्रॅक करणे थोडे कठीण आहे.

हरवलेल्या जनुकामुळे, BA.1 ला साध्या PCR चाचणीद्वारे डीफॉल्टनुसार ट्रॅक केले जाते. तर BA.2 आणि BA.3 फक्त जीनोमिक अनुक्रमाने शोधले जाऊ शकतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, कोरोनाच्या 86% नवीन प्रकरणांमध्ये BA.2 चा हिस्सा आहे.

हे BA.1 आणि BA.1.1 सारख्या इतर सव-व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहे. परंतु आतापर्यंतचे पुरावे असे सूचित करतात की यामुळे गंभीर संक्रमण होण्याची शक्यता कमी आहे.