Israel Palestine Conflict: इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याची तयारी? हमासकडून हजारो रॉकेटची निर्मिती सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 05:34 PM2021-06-01T17:34:55+5:302021-06-01T17:39:23+5:30

Israel Palestine Conflict: इस्रायलवर हजारो रॉकेटचा मारा करणाऱ्या हमासकडून पु्न्हा एकदा हल्ला होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

तेल अवीव: मे २०२१ या महिन्यात इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील संघर्ष शीगेला पोहोचल्याचे संपूर्ण जगाने पाहिले. तब्बल ११ दिवस हजारो रॉकेट्स एकमेकांवर डागण्यात आले.

इस्रायलनेही हमासने केलेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शस्त्रसंधीच्या कराराला मान्यता दिली.

मात्र, बेंजामिन नेतन्याहू यांच्या या निर्णयाला देशातून मोठा विरोध झाला होता. काही दिवस शांततेत गेल्यानंतर आता पुन्हा एकदा हमास इस्रायलवर हल्ला करू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

तासनिम या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलवर हजारो रॉकेटचा मारा करणाऱ्या हमासकडून पु्न्हा एकदा हल्ला होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

हमासने पुन्हा एकदा रॉकेटचे उत्पादन सुरू केले असल्याचे वृत्त आहे. पॅलेस्टाइनमधील सशस्त्र गट हमासने इस्रायलविरोधात झालेल्या हल्ल्यात जवळपास तीन हजारांहून अधिक रॉकेट डागले होते.

हमासचे राजकीय विभाग प्रमुख फतही हमद यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे की, काही दिवसांआधीच इस्रायल आणि हमासमध्ये शस्त्रसंधी लागू करण्यात आली. यासाठी इजिप्तने मध्यस्थी केली.

कारखान्यात पुन्हा एकदा अल कद्स आणि तेल अवीवमध्ये नेतन्याहू यांच्या कट्टरतावादाला रोखण्यासाठी हजारो रॉकेटची निर्मिती केली जात आहे, असे हमीद यांनी सांगितले.

हमास आणि इस्रायलमध्ये १० मे रोजी भीषण संघर्ष सुरू झाला होता. त्यानंतर जवळपास ११ सुरू असलेल्या संघर्षात हमासने इस्रायलवर ४ हजारांवर रॉकेट डागले. तर, इस्रायलने हमासचे प्राबल्य असलेल्या गाझा पट्टीवर जोरदार हवाई हल्ला केला.

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात पॅलेस्टाइनमधील २४३ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये बालकांचा आणि महिलांचा समावेश आहे. तर, हमासच्या हल्ल्यात १२ इस्रायली ठार झाले. यामध्ये एका बालकाचा आणि एका जवानाचा समावेश आहे.

इस्रायल डिफेन्स फोर्सेसने या माहितीला दुजोरा दिला होता. इस्रायल आणि हमास यांच्या संघर्षात ड्रोनच्या माध्यमातूनही हल्ले सुरू होते. मात्र, ड्रोनचे हल्ले इस्रायलने परस्पर उलटवून लावले होते, असे सांगितले जाते.