लष्करी विमानातून १०४ भारतीयांना पाठविण्यासाठी किती खर्च आला? चार्टर्ड विमानही मागे पडेल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 13:27 IST2025-02-07T13:24:07+5:302025-02-07T13:27:35+5:30
ग्वाटेमालाला याच विमानाने अवैध प्रवासी पाठविणात आले होते. हा प्रवास १० तासांचा होता. अमेरिकेचा खर्च वाचवायचा म्हणून महागडा पर्याय का निवडला...

अवैधरित्या अमेरिकेत घुसलेल्या भारतीयांना पायात साखळदंड आणि हातात बेड्या घालून विमानात बसवून भारतात आणून सोडल्याच्या घटनेने राजकारण तापले आहे. अमेरिकेत ट्रम्प यांची पहिली कारकीर्द वादग्रस्त होतीच, परंतू आता दुसरी कारकीर्द देखील त्यापेक्षा वादळी ठरण्याचे संकेत त्यांच्या निर्णयांवरून मिळत आहेत.
एकीकडे अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधरविण्याची भाषा ट्रम्प करत आहेत, अमेरिकन लोकांच्या करातून येणारे पैसे वाचवायचे आहेत. दुसरीकडे ट्रम्प घुसखोर लोकांना बाहेर पाठविण्यासाठी अव्वाच्या सव्वा खर्च करत आहेत.
अमेरिकेने त्यांच्या कायद्यानुसार सर्वच देशांच्या घुसखोरांना त्यांच्या मूळ देशात पाठविण्यास सुरुवात केली आहे. या सर्वांना महिला आणि लहान मुलांना सोडून इतरांना पायात साखळदंड आणि हातात हातकड्या घालून पाठविण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेने ही मोहिम उघडली आहे. भारतात पाठविण्याची आतापर्यंतची सर्वात लांब पल्ल्याची मोहिम होती.
ट्रम्पनी यासाठी लष्कराचे विमान वापरले आहे, ज्याचा खर्च हा सामान्य फ्लाईटच नाही तर चार्टर प्लेनपेक्षाही जास्त आहे. कदाचित सुरुवातीला कठोरपणा दाखविण्यासाठी ते हा खर्च करत असावेत. कारण अमेरिकेत असलेल्या अशा भारतीय घुसखोरांचा आकडा हा साडे सात लाख एवढा मोठा आहे. एवढ्या लोकांना भारतात परत पाठविणे अमेरिकेला परवडणारे नाही. भविष्यात साध्या फ्लाईटने या गोष्टी केल्या जाऊ शकतात.
अमेरिकेने वापरलेले हे विमान C-17 ग्लोबमास्टर हे आहे. हे विमान लष्करी मोठी सामग्री, रणगाडे, हेलिकॉप्टर आदी जड वस्तूंची वाहतूक करण्यासाठी वापरले जाते. भारतात आलेल्या या विमानाला झालेला खर्च हा ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तसेच या विमानाची किंमतही खूप जास्त आहे. जी सर्वच देशांना परवडणारी नाही. इंजिनची क्षमता प्रचंड असल्याने त्याला लागणारे इंधनही खूप जास्त लागते. अशातच हे विमान चार्टर्ड विमानापेक्षाही जास्त खर्चाचे आहे.
ग्वाटेमालाला याच विमानाने अवैध प्रवासी पाठविणात आले होते. हा प्रवास १० तासांचा होता. यासाठी या विमानाला 28,500 डॉलर प्रति तास खर्च आला. टेक्सासहून अमृतसरला जाण्यासाठी ३५ तासांहून अधिकचा वेळ लागला. यामुळे हा खर्च काही करोडमध्ये आला असावा असा अंदाज अमेरिकी अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.
अमेरिका इतर वेळी साधी प्रवासी विमाने अशा अवैध प्रवाशांना परत पाठविण्यासाठी भाड्याने घेते. ही विमाने बोईंग ७३७ आणि एमडी ८० सिरीजची असतात. परंतू, यावेळी कठोर संदेश देण्यासाठी ट्रम्पनी अमेरिकेच्या हवाई दलालाच कामाला लावले आहे.