चीनने हल्ला केल्यास तैवान करणार ‘बोचरा’ वार, सैन्याने केली पूर्ण तयारी By बाळकृष्ण परब | Published: November 7, 2020 03:12 PM 2020-11-07T15:12:58+5:30 2020-11-07T15:38:05+5:30
China-Taiwan News : चीन कधीही हल्ला करू शकतो, अशी भीती तैवानकडून सातत्याने व्यक्त करण्यात येत आहे. या सर्वादरम्यान, चीनच्या आक्रमणाला पायबंद घालण्यासाठी तैवानने तयारी करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चीन आणि तैवान यांच्यात कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. चीन कधीही हल्ला करू शकतो, अशी भीती तैवानकडून सातत्याने व्यक्त करण्यात येत आहे. या सर्वादरम्यान, चीनच्या आक्रमणाला पायबंद घालण्यासाठी तैवानने तयारी करण्यास सुरुवात केली असून, समुद्र किनाऱ्यांवर अँटी लँडिंग स्पाइक लावले आहेत.
द एशियन पोस्टच्या एक रिपोर्टनुसार तैवानने हे पाऊल संरक्षणाच्या दृष्टीकोनातून उचलले आहे. अँटी लँडिंग स्पाइक म्हणजे एक प्रकारचे लोखंडाचे टोकदार खांब असतात. चिनी सैन्य समुद्री मार्गाने तिथे पोहोचू नये म्हणून तैवानने किनमेन बेटाच्या किनाऱ्यांवर हे अँटी लँडिंग स्पाइक लावले आहेत.
एवढेच नाही तर तैवानने या स्पाइकपासन काही अंतरावर टँक तैनात केले आहे. हे टँक समुद्रात दूरवरूनही दिसून येतात. मात्र समुद्र किनाऱ्यावर कुठले तरी स्मारक उभारण्यात येत असावे, अशीही तैवानमध्ये चर्चा सुरू आहे.
मात्र सध्यातरी चीन आणि तैवानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांच्या राजनीतिक अधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्यापासून तणाव अधिकच वाढला आहे. दुसरीकडे अमेरिकेने तैवानला हार्पुन पॉवर दिल्याने तैवानचे बळ वाढले आहे.
अमेरिकेने तैवानसोबत लष्करी करार केला आहे. या करारानुसार अमेरिका तैवानला ६० कोटी डॉलरचे सशस्त्र ड्रोन देणार आहे. अमेरिकेकडून हत्यारे मिळाल्यानंतर तैवानला आपले लष्करी सामर्थ्य आणि राजकीय स्थैर्य कायम राखण्यात मदत होईल.
अमेरिकेने तैवानसोबतचा लष्करी करार रद्द केला पाहिजे. तैवान हा चीनचा भाग आहे. आम्ही कुठल्याही देशाची ढवळाढवळ सहन करणार नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेबिन यांनी सांगितले होते.
जर अमेरिकेने तैवानसोबतचा हत्यारांचा करार रद्द केला नाही तर त्यामुळे चीन आणि अमेरिकेमधील संबंध बिघडतील. तसेच चीन आणि तैवानमधील शांततेवरही परिणाम होईल, असा इशारा वांग यांनी दिला होता.
अमेरिकेच्या हार्पून क्षेपणास्त्राचा विचार केल्यास हे अत्यंत शक्तिशाली हत्यार आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीवरील लक्ष्याप्रमाणेच युद्धनौकांनाही नष्ट करू शकते. या क्षेपणास्त्रामध्ये जीपीएस प्रणाली लावलेली असते. त्यामुळे अचूक हल्ला करण्यास मदत होते.
तैवान हा आपल्याच देशाचा भाग असल्याचा दावा चीनकडून केला जातो. तसेच तैवानवर कब्जा करण्यासाठी चीनने अनेकदा धमक्याही दिल्या आहेत. १९४९ मध्ये गृहयुद्धादरम्यान तैवान चीनपासून वेगळा झाला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू आहे.