मंदिर बांधण्यास बंदी, पूजाविधी केल्यास कठोर शिक्षा, भारताशेजारील या देशात आहेत सक्त कठोर धार्मिक कायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 17:55 IST2025-03-07T17:47:48+5:302025-03-07T17:55:25+5:30

Maldives News: आज वाढत्या जागतिकीकरणामुळे उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने भारतीय लोक जगभरात पोहोचत आहेत. त्यासोबतच तिथे हिंदू मंदिरंही बांधली जात आहेत. अगदी कट्टर धार्मिक नियम असलेल्या आखाती देशांमध्येही काही मंदिरं उभी राहत आहेत. अगदी पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही हिंदू मंदिरं आहेत. तसेच तिथे काही सण समारंभही साजरे होतात. मात्र भारताच्या शेजारी असेल्या एका देशात मात्र मंदिर बांधण्यास सक्त मनाई आहे. तसेच तिथे नोकरी धंद्यानिमित्त राहत असलेल्या हिंदूंना अगदी लपून-छपून पूजापाठ करावा लागतो.

आज वाढत्या जागतिकीकरणामुळे उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने भारतीय लोक जगभरात पोहोचत आहेत. त्यासोबतच तिथे हिंदू मंदिरंही बांधली जात आहेत. अगदी कट्टर धार्मिक नियम असलेल्या आखाती देशांमध्येही काही मंदिरं उभी राहत आहेत. अगदी पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही हिंदू मंदिरं आहेत. तसेच तिथे काही सण समारंभही साजरे होतात. मात्र भारताच्या शेजारी असेल्या एका देशात मात्र मंदिर बांधण्यास सक्त मनाई आहे. तसेच तिथे नोकरी धंद्यानिमित्त राहत असलेल्या हिंदूंना अगदी लपून-छपून पूजापाठ करावा लागतो.

या देशाचं नाव आहे मालदीव. भारताच्या शेजारील पिटुकलं राष्ट्र असलेल्या मालदीवमध्ये एकेकाळी हिंदू आणि बौद्ध संस्कृतीचा प्रभाव होता. तसेच येथे हिंदू राजांचं राज्य होतं. मात्र आता येथे या दोन्ही संस्कृतींचा प्रभाव संपुष्टात आला आहे.

मालदीवच्या संविधानानुसार या देशामध्ये सर्व नागरिक मुस्लिम असणं अनिवार्य आहे. तसेच गैर इस्लामिक धार्मिक चिन्हे, प्रथा आणि प्रार्थनास्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे येथे कुठलंही हिंदू मंदिर आढळून येत नाही.

मालदीवचं संविधान स्पष्टपणे सांगतं की, मालदीव हा १०० टक्के इस्लामिक देश आहे. या देशाचं नागरिकत्व इस्लाम धर्माच्या अनुयायांनाच मिळतं. मालदिवच्या संविधानानुसार मालदिवमध्ये गैर-इस्लामी धर्माचा प्रचार, प्रार्थनास्थळांची निर्मिती हे पूर्णपणे निशिद्ध आहे. त्यामुळे हिंदू मंदिर, चर्च, गुरुद्वारा आदी प्रार्थनास्थळांची बांधणी मालदीवमध्ये करता येत नाही.

मालदिवच्या घटनेमध्ये दुरुस्ती करून देशामध्ये मशिदी सोडून अन्य कुठल्याही धार्मिक प्रार्थनास्थळांच्या निर्मितीला परवानगी दिली जाणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे मालदीवमध्ये राहत असलेले मोजके हिंदू सार्वजनिक ठिकाणी कुठलंही धार्मिक कार्य, रीतिरिवाज, परंपरा आदींचं पालन करू शकत नाहीत.

मालदीवमध्ये मूर्तीपूजा आणि सामूहिकरीत्या कार्यक्रम घेणं अशक्य असल्याने येथे राहत असलेले मोजके हिंदू त्यांच्या निवासस्थानी गोपनीय पद्धतीने पूजाविधी करतात. येथे पूजेचं साहित्यही सहजासहजी मिळत नाही.

धार्मिक चिन्ह आणण्यावर बंदी असल्याने आणि विमानतळावर कठोर तपासणी होत असल्याने असं साहित्य मालदीवमध्ये लपवून आणावं लागतं. जर अशा साहित्यासह कुणी पकडलं गेलं तर त्याला दंडात्मक कारवाई, तुरुंगवास किंवा देशातून हकालपट्टी अशा शिक्षा होऊ शकतात.