भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 10:56 PM2020-07-23T22:56:15+5:302020-07-23T23:26:16+5:30

या आठवड्यात इस्रायलचे वैज्ञानिक एका विशेष विमानाने भारतात येत आहेत. जे भारतीय वैज्ञानिकांबरोबर कोरोना व्हायरसच्या तपासणीसंदर्भात 4 नव्या पद्धतींवर काम करतील. जर त्यांना यश आले, तर हा कोरोनाबरोबरच्या युद्धात टर्निंग पॉईंट सिद्ध होऊ शकतो.

यातील दोन चाचण्या लाळेची तपासणी केल्यानतंर काही मिनिटांतच निकाल देतील. तिसऱ्या चाचणीत एखाद्याच्या आवाजावरूनच सांगितले जाऊ शकते, की संबंधित व्यक्ती कोरोग्रस्त आहे अथवा नाही. तर चौथ्या चाचणीत श्वासाच्या रेडिओ वेवने संक्रमणाची तपासणी करता येऊ शकेल.

इस्रायली वैज्ञानिक राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयात यावर संशोधन करतील. भारतातील इस्रायलचे राजदूत रोन मलकिन यांनी सांगितले, ''या टेस्ट तंत्राच्या पहिल्या टप्प्याची तपासणी इस्रायल मध्ये करण्यात आली आहे. तर अखेरच्या टप्प्याची चाचणी भारतात केली जाणार आहे.''

इस्रायलचे डायरेक्टरेट ऑफ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेन्टचे प्रमुख डॅनी गोल्ड यांनी सांगितले, की एका तंत्रात पॉलीएमिनो अॅसिडचा वापर केला जातो, यात केवळ 30 मिनिटांत निकाल येतो.

''याचा अर्थ, एअरपोर्ट, मॉल अथवा इतर ठिकाणी आपली तापासणी केली जाऊ शकते. या रिअल टाइम टेस्टिंगमुळे अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्यास मदद मिळेल.''

एक दुसरी स्वस्त बायोकेमिकल टेस्ट घरीच केली जाऊ शखते आणि 30 मिनिटांत याचाही रिझल्ट येतो. या दोन्ही तपासण्या लाळेच्या नमुन्यानेच केल्या जातात.

तिसऱ्या तंत्रात, आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सचा वापर करून एखाद्या व्यक्तीचा आवाज ऐकून, त्याला कोरोनाचा संसर्ग आहे अथवा नाही, याचा तपास लावला जाऊ शकतो.

गोल्ड यांनी सांगितले, की ''कोविड रेस्पिरेटरी सिस्टमवर हल्ला करतो. यामुळे फोनवर आवाजाच्या माध्यमानेही संक्रमणासंदर्भात माहिती मिळू शकते.''

एक चौथे तंत्र ब्रीथ अॅनलायझरचे आहे. ते म्हणाले, ''एखादी व्यक्ती ट्यूबने श्वास घेईल. आम्ही ट्यूब एका मशीनमध्ये टाकतो. ही मशीन, आपण कोरोना संक्रमित आहोत अथवा नाही, हे टेराहर्ट्झ रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि अल्गोरिदमच्या माध्यमाने सांगेल.

मलकिन यांनी सांगितले, की हा प्रोजेक्ट गोल्ड आणि पंतप्रधान मोदी यांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांच्या नेतृत्वाच चालेल.

फंडिंग, लॉजिस्टिक्स, कोऑपेरशन आणि परिणाम सामाईक आहे. इस्रायली आणि भारतीय वैज्ञानिक देशातील किमान 4 ते 5 हजार लोकांवर या तंत्राचा वापर करतील.

या विमानाने अनेक आधुनिक तंत्र आणि उपकरणेदेखील भारतात आणली जातील. यात रोबोट, टेलीमेडिसिन, स्पेशल सॅनिटायझिंग इक्विपमेंट्स आदींचा समावेश असेल.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी.