ऑनलाइन लोकमतढाका, दि. १ - बांगलादेशची राजधानी ढाका येथील सुरक्षित मानल्या जाणाऱ्या डिप्लोमॅटिक क्वॉर्टरच्या उपाहारगृहात शुक्रवारी रात्री ५ ते ९ दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २० जण ठार झाल्याचे समजते. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरियाने (इसिस)स्वीकारली असून दहशतवाद्यांनी २० परदेशी नागरिकांसह ६० जणांना ओलिस ठेवलं आहे. हल्लेखोरांनी आतापर्यंत २० जणांना ठार केल्याचं वृत्त असून मृतांमध्ये इटलीचे दोन नागरिक आणि दोन पोलीस अधिका-यांचाही समावेश आहे. हल्लेखोर व पोलिसांदरम्यान चकमक सुरू असून २० पोलिस जखमी झाले आहेत.डिप्लोमॅटिक क्वॉर्टरच्या उपाहारगृहाच्या बाहेर शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास गोळीबारास सुरुवात झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री ८ ते ९ सशस्त्र हल्लेखोर या भागातील होले आर्टिजन बेकरी रेस्टॉरंटमध्ये घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आसपासच्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. मात्र रेस्टॉरंटमधील नागरिकांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवत पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यानंतर पोलिसांनी या रेस्टॉरंटला पूर्णपणे घेरत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान ढाका येथील सर्व भारतीय अधिकारी सुरक्षित आहेत, अशी माहिती बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्तांनी दिली आहे. हल्लेखोरांनी बॉम्ब फेकल्याचेही वृत्त असून, ते काही वेळाच्या अंतराने गोळीबार करीत होते. हल्लेखोरांच्या गोळीबारात काही पोलीस आणि नागरिक जखमी झाले. रेस्टॉरंटचा एक कर्मचारी कसाबसा येथून बाहेर पडला. त्याने दिलेल्या माहितीनुसार रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास काही हल्लेखोर या रेस्टॉरंटमध्ये आले आणि त्यांनी येथील मुख्य शेफला बंधक बनविले. या हल्लेखोरांनी केलेल्या बॉम्बस्फोटामुळे येथे प्रचंड दहशत पसरली आहे. ढाक्यातील रेस्टॉरंटमध्ये परदेशी नागरिकांसह काही जणांना ओलिस ठेवलं असल्याची अमेरिकन दूतावासाकडून माहिती मिळाली आहे.हल्ला झाला त्यावेळी २०० मीटर अंतरावरील स्वतःच्या कार्यालयात असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, "रस्त्यावर गोळीबाराचा आवाज ऐकू येत होता. मला वाटलं कदाचित कुठल्या तरी चोरानं गोळीबार केला असेल. मात्र बाहेर पाहिल्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं समजलं". जवळपास ९ तासांहून अधिक काळ हे दहशतवादी या कॅफेमध्ये ६० जणांना ओलीस ठेवून लपून बसले आहेत. बांगलादेश पोलिसांनी या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी एक ऑपरेशनही राबवलं आहे. ढाका येथील डिप्लोमॅटिक क्वॉर्टरचे उपाहारगृह Dhaka (Bangladesh) hostage crisis: Visuals of the security forces near the spot. #Bangladesh pic.twitter.com/Q9QFcmqXQd— ANI (@ANI_news) July 2, 2016