Ismail Haniyeh : अमेरिकेनं दहशतवादी घोषित केलेला इस्माईल हानिया कोण होता? पंतप्रधान पदावर राहिलेली व्यक्ती मोस्ट वॉन्टेड कशी बनली?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 12:46 PM2024-07-31T12:46:41+5:302024-07-31T12:55:44+5:30

Hamas Chief Ismail Haniyeh assassinated in Iran : इस्माईल हानिया हा गेल्या अनेक वर्षांपासून हमासचा प्रमुख होता.

इस्रायल-हमास युद्धादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं हमास प्रमुख इस्माईल हानिया यांची हत्या झाल्याची माहिती दिली आहे. इस्माईल हानिया हा गेल्या अनेक वर्षांपासून हमासचा प्रमुख होता.

दरम्यान, गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला इस्रायलवर इतिहासातील सर्वात भीषण हल्ला झाला होता. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून हिंसाचार केला होता. त्यावेळी अनेक निरपराध, निर्दोष नागरिकांची हत्या केली होती. या हत्याकांडाची योजना इस्माईल हानिया यानं आखल्याचा आरोप होता.

अखेर ९ महिन्यापासून बदल्याच्या आगीमध्ये होरपळणाऱ्या इस्रायलनं हमासचा प्रमुख इस्माईल हानियाला संपवलं. इस्रायलनं इराणच्या तेहरानमधील इस्माईल हानिया लपलेल्या ठिकाणावर हल्ला करण्यात आला होता. यात इस्माईल हानिया आणि त्याचा अंगरक्षक ठार झाल्याचं म्हटलं आहे. जाणून घ्या, इस्माईल हानियाच्या काही खास गोष्टी....

इस्माईल हानिया हा हमासच्या पॉलिटिकल ब्युरोचा प्रमुख होता. पॅलेस्टिनी प्राधिकरणाच्या दहाव्या सरकारमध्ये त्यानं पंतप्रधानपद भूषवलं होतं. इस्माईल हानिया हा २००६ मध्ये पंतप्रधान बनला, परंतु एका वर्षानंतर पॅलेस्टिनी राष्ट्रीय प्राधिकरणाचे प्रमुख महमूद अब्बास यांनी त्याला पदावरून हटवलं. कारण, गाझा पट्टीवर अल-कसाम ब्रिगेड्सनं ताबा मिळवला होता आणि फतह चळवळीच्या नेत्यांना हाकलून लावलं होतं.

बीबीसीच्या म्हणण्यानुसार, १९८९ मध्ये इस्माईल हानियाला इस्रायलनं तीन वर्षांसाठी तुरुंगात डांबलं होतं. त्यानंतर इस्माईल हानियालाच्या इतर नेत्यांसमवेत इस्रायल आणि लेबनॉन दरम्यान असलेल्या मार्ज अल-झहुर येथं पाठवण्यात आलं होतं. याठिकाणी इस्माईल हानिया एक वर्ष राहिला होता. त्यानंतर पुन्हा गाझाला परतला होता.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं २०१८ मध्ये इस्माईल हानियाला दहशतवादी घोषित केलं होतं. इस्माईल हानियाची २०१७ मध्ये हमासच्या राजकीय ब्युरोचे प्रमुख म्हणून निवड झाली होती, परंतु तो गाझामध्ये नसून कतारमध्ये राहत होता. इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थीनं झालेल्या शांतता चर्चेत हानिया यानं हमासचं नेतृत्व केलं होतं. गेल्या मे महिन्यातच आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयानं हानियाविरुद्ध अटक वॉरंटची मागणी केली होती.

इस्माईल हानिया हा हमास या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या होता. इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्यासाठी तो इराणला गेला होता. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं म्हटलं आहे की, तेहरानमधील इस्माईल हानिया लपलेल्या ठिकाणावर हल्ला करण्यात आला होता. ज्यात हमासचा प्रमुख तसेच एक अंगरक्षक ठार झाला होता.