हायटेक सुरक्षा यंत्रणा, तरीही हमाससमोर हतबल ठरला इस्राइल, समोर आलं धक्कादायक कारण By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 12:08 PM 2023-10-08T12:08:59+5:30 2023-10-08T12:12:29+5:30
Israel Hamas War: इस्राइलवर हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. इस्राइलने गाझा बॉर्डरवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही ही सुरक्षाव्यवस्था भेदून दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने सारेच अवाक् झाले आहेत. इस्राइलवर हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. इस्राइलने गाझा बॉर्डरवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही ही सुरक्षाव्यवस्था भेदून दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने सारेच अवाक् झाले आहेत. बॉर्डरवर फेन्सिंग करण्यात आली आहे. तसेच हायटेक सेंसर्सही लावण्यात आले आहेत. तरीही दहशतवादी घुसखोरी करण्यात यशस्वी ठरले.
हमासने दावा केला की, ते या हल्ल्यासाठी बऱ्याच काळापासून तयारी करत होता. मात्र जगातील सर्वात खतरनाक गुप्तचर यंत्रणा असलेल्या मोसादला एवढ्या मोठ्या हल्ल्याची कानोकान खबर कशी काय लागली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या हल्ल्यानंतर हमासने एक व्हिडीओ प्रसिद्ध करून इस्राइलच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळले आहे. या व्हिडीओमध्ये हमासचे दहशतवादी इस्राइलच्या इरेज क्रॉसिंगवर कब्जा करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये हमासचे दहशतवादी बॉम्बफेक करून बॅरियर तोडताना आणि नंतर गोळीबार करत इस्राइलच्या हद्दीत घुसताना दिसत आहेत. व्हिडीओ पाहून हमासने या हल्ल्याची पूर्ण तयारी केल्याचे दिसत आहे.
हमासने आणखी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. त्यात त्याचे हल्लेखोर ट्रेनिंग घेताना दिसत आहेत. एवढंच नाही तर हमासने आपलं मिसाइल सिस्टिमही विकसित केलेली आहे. त्याचा वापर त्यांच्या हल्लेखोरांनी इस्राइलविरोधात केला. रंजूम नावाच्या या शॉर्ट रेंज मिसाईल सिस्टिमचे फोटो हमासने इस्राइलमध्ये घुसखोरी केल्यानंतर प्रसिद्ध केले. या व्हिडीओमध्ये हमासचे दहशतवादी याच सिस्टिमच्या मदतीने हल्ला करताना दिसत आहेत.
हमासचे दहशतवादी जमीन, हवा आणि पाण्यातून मार्ग काढत इस्राइलमध्ये घुसखोरी करण्यात यशस्वी ठरले. पूर्वतयारीशिवाय असा हल्ला करणे शक्य नव्हते. त्याची तयारी करण्यास अनेक दिवस लागले असतील. मात्र इस्राइलच्या सुरक्षा यंत्रणांना याची खबर न लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, इस्राइलच्या सुरक्षा यंत्रणेला लागलेल्या सुरुंगामागे अतिआत्मविश्वास आणि बेफिकीरी ही दोन कारणे असू शकतात. हमासने इस्राइलवर सुमारे ५ हजार क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा केला होता. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे इस्राइलच्या सुरक्षा यंत्रणेला सावरण्यासही वेळ मिळाला नाही. त्यामुळेच हमासचे दहशतवादी केवळ इस्राइलमध्ये घुसखोरी करूनच थांबले नाही तर त्यांनी अनेकांना बंदी बनवले. यादरम्यान, त्यांना इस्राइलच्या सुरक्षा दलांकडून विरोधाचा सामनाही करावा लागला नाही.