कोण आहेत केयर स्टार्मर? ऋषी सुनक यांना मोठा धक्का देत होतील ब्रिटनचे नवे पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 11:58 AM2024-07-05T11:58:14+5:302024-07-05T12:52:12+5:30

विरोधक पार्टी असलेली लेबर पार्टी ही दणदणीत विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी वेळेपूर्वी निवडणुका घेण्याची घोषणा केली होती. मात्र, आता त्यांची ही चाल उलटसुलट होताना दिसत आहे. विरोधक पार्टी असलेली लेबर पार्टी ही दणदणीत विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

ऋषी सुनक यांची कंझर्व्हेटिव्ह पार्टी निवडणुकीच्या निकालात खूपच पिछाडीवर पडली आहे. अशा परिस्थितीत लेबर पार्टीचे नेतृत्व करत असलेले केयर स्टार्मर हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होऊ शकतीत, असे म्हटले जात आहे. दरम्यान, पराभव समोर दिसू लागल्यानंतर ऋषी सुनक यांनी उद्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे.

६१ वर्षीय केयर स्टार्मर हे लेबर पार्टीचे नेते आहेत. त्यांचा जन्म २ सप्टेंबर १९६२ रोजी ऑक्स्टेड, सरे येथे एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांची आई नर्स होती. त्या संधिवाताने ग्रस्त होत्या. केयर स्टार्मर यांचे वडील टूल बनवण्याचे काम करत होते. केयर स्टार्मर यांनी रीगेट ग्रामर स्कूलमधून शिक्षण घेतले. तसेच, युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलेले केयर स्टार्मर हे त्यांच्या कुटुंबातील पहिले व्यक्ती होते.

राजकारणात येण्यापूर्वी केयर स्टार्मर वकील म्हणून काम करत होते. ते ब्रिटनमधील मानवाधिकार प्रकरणांतील प्रसिद्ध वकील होते. त्यांनी लीड्स युनिव्हर्सिटीत कायद्याचे शिक्षण घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, केयर स्टार्मर यांनी १९८७ मध्ये बॅरिस्टर म्हणून करिअरची सुरुवात केली होती.

केयर स्टार्मर यांनी २०१५ मध्ये संसदेत प्रवेश केला आणि २०२० मध्ये लेबर पार्टीचे नेतृत्व स्वीकारले. त्यांच्या नेतृत्वाखालीच लेबर पार्टीला सत्ता मिळवण्यात यश येत आहे. १४ वर्षांनंतर ब्रिटनमध्ये लेबर पार्टी पुन्हा सत्तेवर येणार आहे. केयर स्टार्मर यांनी वित्तीय जबाबदारी सांभाळून सार्वजनिक सेवा पुन्हा सुरु करण्याचा दावा केला आहे.

केयर स्टार्मर यांची अंदाजे एकूण संपत्ती जवळपास ७.७ मिलियन पौंड आहे. त्यांची बहुतेक संपत्ती ही त्यांच्या राजकीय आणि कायदेशीर कारकिर्दीतून येते. त्यांच्याकडे जवळपास १० पौंड मिलियन किमतीची जमीन आहे, जी त्यांनी १९९६ मध्ये वकील असताना खरेदी केली होती. केयर स्टार्मर यांची एकूण संपत्ती यूकेमधील सरासरी कुटुंबापेक्षा २५ पट जास्त असली तरी, ऋषी सुनक यांच्या तुलनेत ती कमीच आहे.

सध्या युरोपात प्रचंड गोंधळ सुरू आहे. मात्र, रशिया-युक्रेन युद्धाबाबत नव्या ब्रिटिश सरकारच्या धोरणात फारसा बदल होणार नसल्याचे म्हटले जात आहे. केयर स्टार्मर यांनी रशियाविरुद्ध युक्रेनला मदत करण्याबद्दल बोलले आहेत. यासोबतच त्यांनी गाझामध्ये युद्धविरामचे आवाहन केले आहे. हमासच्या ताब्यात असलेल्या इस्रायली बंधकांची सुटका करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.