CoronaVirus New Strain: ब्रिटन, ब्राझीलनंतर आता न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा नवा प्रकार; अधिक तीव्र आणि घातक असल्याचा दावा By देवेश फडके | Published: February 26, 2021 01:14 PM 2021-02-26T13:14:12+5:30 2021-02-26T13:20:16+5:30
ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, कॅलिफोर्निया येथे कोरोनाचे प्रकार आढळून आल्यानंतर आता अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्येही कोरोना नवा प्रकार आढळून आला आहे. न्यूयॉर्कमधील सुमारे २५ टक्के नागरिकांना कोरोनाच्या या नव्या प्रकाराची लागण झाली असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. (CoronaVirus new strain in new york) ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, कॅलिफोर्निया येथे कोरोनाचे प्रकार आढळून आल्यानंतर आता अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्येही कोरोना नवा प्रकार आढळून आला आहे. न्यूयॉर्कमधील कोरोनाचा नवा प्रकार अधिक तीव्र आणि घातक असल्याचा दावा शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
कोरोनाचा नवीन प्रकार न्यूयॉर्क शहरात वेगाने पसरत असून, गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात प्रथम कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला होता. मात्र, यावर काही प्रमाणात संशोधन झाल्यानंतर याची माहिती दिली जात असल्याचे सांगितले जात आहे. (CoronaVirus new strain in new york)
न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, न्यूयॉर्क शहरात आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराचे नाव B.1.526 असे आहे. न्यूयॉर्कमधील सुमारे २५ टक्के नागरिकांना कोरोनाच्या या नव्या प्रकाराची लागण झाली असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
न्यूयॉर्कमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारावर उपलब्ध असलेल्या लसींपैकी कोणतीही लस प्रभावी ठरत नसल्याचे दिसून येत आहे. ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि कॅलिफोर्निया येथे आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारांपेक्षा न्यूयॉर्कमधील कोरोनाचा नवा प्रकार अधिक धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे.
न्यूयॉर्कमधील कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग अधिक तीव्र गतीने होत असून, मानवी शरीरातील पेशींवर तो जलदगतीने प्रभाव करतो, असेही संशोधनात आढळून आल्याचे सांगितले जात आहे.
कोरोनाच्या B.1.526 या नव्या प्रकाराचे आणखी दोन उपप्रकार असल्याची माहिती शास्त्रज्ञांकडून देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असून, यामुळे शारीरिक क्षमतांवर परिणामकारक असल्याचे सांगितले जात आहे.
जागतिक स्तरावर उपलब्ध असलेल्या कोरोना लसींपैकी एकही लस कोरोनाच्या या नव्या प्रकारावर प्रभावी ठरत नसल्याचेही शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले होते. न्यूयॉर्क येथील रुग्णालयातून हजारो रुग्णांचे नमुने एकत्र करण्यात आले होते. याच्या अभ्यासावरून कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
अॅरोन डायमंड एड्स रिसर्च सेंटरचे व्यवस्थापक डॉ. डेविड यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या प्रकाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव न्यूयॉर्क शहरात होताना दिसत आहे. यावर आणखी संशोधन होणे गरजेचे आहे.
कॅलिफोर्निया येथेही अलीकडेच कोरोना नवा प्रकार आढळला असून, डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी याला दुजोरा दिला आहे. दरम्यान, भारतीय शास्त्रज्ञांनी धक्कादायक खुलासा केला आहे. ६०१७ जीनोम सिक्वेन्सच्या आधारावर संपूर्ण देशभरात तब्बल ७ हजार ६८४ प्रकारचे कोरोना विषाणू असल्याचा दावा करण्यात आला आहे.
कोरोनाच्या हजारो प्रकारांपैकी एन४४० याचा प्रादुर्भाव सर्वाधिक असल्याचे शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले आहे. तेलंगण राज्यात ९८७ आणि आंध्र प्रदेशमध्ये २९६ प्रकारचे कोरोना विषाणू मिळाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.