पाकचा एक दहशतवादी जो मेल्यानंतर 'जिवंत' झाला अन् आता चीननं त्याला वाचवलं; वाचा संपूर्ण कहाणी... By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 12:30 PM 2022-09-18T12:30:02+5:30 2022-09-18T12:41:14+5:30
2008 सालच्या मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि दहशतवादी साजिद मीरला दहशतवादी घोषीत करण्यावर चीननं नकार दर्शवला आहे. लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी साजिद मीर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्याचा ठराव संयुक्त राष्ट्रानं आणला, मात्र चीननं प्रस्तावाला नकार दिला. या प्रस्तावाद्वारे साजिद मीरचा काळ्या यादीत समावेश करण्यात येणार होता.
कोण आहे साजिद मीर? साजिद मीर हा पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा कमांडर आहे. पाकिस्तानात जन्मलेला साजिद हा एकमेव दहशतवादी आहे ज्याच्या मदतीनं कसाब आणि त्याच्या साथीदारांनी नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवर हल्ला केला होता. साजिद मीर या हल्ल्यांचा सूत्रधार असल्याचं सांगण्यात आलं.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, साजिदनेच 2008 च्या हल्ल्याची संपूर्ण योजना आखली होती. एप्रिल 2011 मध्ये, अमेरिकेने त्याला मुंबई हल्ल्यासाठी जबाबदार धरून जागतिक दहशतवादी घोषित केलं. साजिदच्या अटकेसाठी पाकिस्तानवर दबाव वाढला तेव्हा पाकिस्ताननं साजिदचा मृत्यू झाल्याचा दावा केला. साजिदला फार कमी लोकांनी पाहिलं असल्याचं म्हटलं जातं.
अनेक दिवसांपासून पाकिस्तानकडून साजिद जीवंत नसल्याचं सांगण्यात येत होतं. पण पाकिस्तानकडून फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या (FAFT) ग्रे लिस्टमधून जूनमध्ये दहशतवादी फंडिंग प्रकरणात त्याला १५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, मुंबई हल्ल्यात त्याचा सहभाग असल्याच्या आरोपावर पाकिस्ताननं त्याच्यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.
जगभरातून होणारी टीका टाळण्यासाठी पाकिस्ताननं आधी साजिदच्या मृत्यूचं कारण पुढे केलं आणि नंतर त्याला जिवंत असल्याचं सांगत शिक्षा सुनावली. आता साजिद पाकिस्तानच्या कोट लखपत तुरुंगात बंद आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2005 मध्ये तो बनावट पासपोर्टवरून क्रिकेट मॅच पाहण्यासाठी भारतात आला होता.
अमेरिकन गुप्तचर संस्था एफबीआयचे म्हणणे आहे की, साजिद पाकिस्तानमध्ये आहे. साजिदने डेन्मार्कमध्येही हल्ला करून वृत्तपत्र कर्मचाऱ्यांना लक्ष्य केलं होतं. मीडिया रिपोर्टमध्ये त्याचं वय ४० वर्षे दाखवण्यात आलं असून तो ९० च्या दशकात लष्कर-ए-तैयबामध्ये सामील झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
चीनने यावर्षी पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांना काळ्या यादीत टाकण्याचे सर्व प्रस्ताव रोखले आहेत. गेल्या महिन्यात, जैश-ए मोहम्मद (जेएम) प्रमुख मसूद अझहरचा भाऊ आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेचा वरिष्ठ नेता अब्दुल रौफ अझहर याला काळ्या यादीत टाकण्याच्या यूएस-समर्थित प्रस्तावावरील तांत्रिक स्थगिती रोखण्यात आली होती.
या वर्षी जूनमध्ये चीनने 1267 अल-कायदा प्रतिबंध समितीमध्ये अब्दुल रहमान मक्की विरुद्ध अमेरिका-भारत-समर्थित संयुक्त ठरावाला विरोध केला. आता पुन्हा एकदा चीनने पाकिस्तानला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.