लंडन ते UN मुख्यालय; जगभरात व्हायरल होतायत या 30 इस्रायली मुलांचे फोटो, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 07:01 PM2023-10-20T19:01:51+5:302023-10-20T19:08:19+5:30

लंडन, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, रोमसह जगभरातील अनेक शहरांमध्ये या मुलांचे फोटो दाखवले जात आहेत.

Israel-Hamas War: दक्षिण इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्याला जवळपास दोन आठवडे उलटून गेले आहेत. हमासने शेकडो लोकांचे अपहरण केले होते, यातील 200 लोक अजूनही बेपत्ता आहेत. हमासने त्यांना ओलीस ठेवल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे.

यामध्ये 30 लहान मुले आणि वृद्धांचा समावेश आहे. दरम्यान, लंडनच्या रस्त्यांपासून ते यूएन मुख्यालयाच्या इमारतीपर्यंत, या मुलांचे फोटो व्हायरल होत आहेत. इस्रायलने याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

लंडनमधील वेंबली ते टेट मॉडर्नपर्यंतच्या अनेक प्रसिद्ध इमारतींवर या बेपत्ता इस्रायली मुलांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस आणि मियामीसह अनेक शहरांमध्येही होर्डिंगवर अशीच चित्रे लावण्यात आली आहेत. यासाठी एक मोहीम सुरू करण्यात आली आहे. याद्वारे या बेपत्ता मुलांची माहिती दिली जात आहे.किडनॅप बाय हमास असेही त्यावर लिहिले आहे.

इस्रायलने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये लंडनच्या अनेक इमारती आणि स्क्रीन्स असलेल्या वाहनांवर ही फोटो लावण्यात आली आहेत. मुलांची फोटोसह, त्यांची नावे आणि वय लिहिलेले आहे.

तसेच #BRINGTHEMBACK हॅशटॅग वापरण्यात आला आहे. यूएन हेडक्वार्टर, रोमानियन शहरे आणि इतर अनेक शहरांच्या भिंतींवरही मुलांचे फोटो दाखवणारे इलेक्ट्रिक बिलबोर्ड लावण्यात आले आहेत.

इस्रायली मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या या मोहिमेच्या प्रवक्त्याने ब्रिटीश मीडियाला सांगितले की, नऊ महिन्यांच्या बाळापासून विविध वयोगटातील मुलांच्या अपहरणाने जगभरातील लोकांना धक्का बसला आहे. या निष्पाप मुलांची काय चुकी, त्यांच्यावर तिथे काय अत्याचार होत असतील, याचा विचार करुनही मन भरून येते.

या मुलांचे चेहरे लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून प्रत्येक मुलगा घरी येईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला आशा आहे की, लंडन आणि उर्वरित जगातील प्रमुख ठिकाणी ही मोहीम प्रत्येकाला या प्रयत्नात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करेल.

इस्रायली लष्कराने गुरुवारी सांगितले होते की, 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या विनाशकारी हल्ल्यांमध्ये हमासने 203 लोकांना ओलीस ठेवले होते. यापैकी सुमारे 30 मुले आहेत, ज्यांचे वय 16 वर्षांपेक्षा कमी आहे. त्याचबरोबर 60 वर्षांवरील 20 वृद्धांनाही तुरुंगात डांबण्यात आले आहे.

हमासने गाझा पट्ट्यात नागरिकांना ओलीस ठेवले आहे, मात्र नेमकं कुठे ठेवण्यात आले, याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे त्यांची सुटका करण्यात अडचण येत आहे. गाझा पट्ट्यातील विविध बोगद्यांमध्ये हमासने अनेकांना ओलीस ठेवल्याचे मानले जात आहे. इस्रायली लष्कर या बोगद्यांना 'गाझा मेट्रो' म्हणते.

7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर रॉकेट डागून संघर्षाची सुरुवात केली. यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा करताना हमासचा नाष करण्याचा प्रण उचलला. युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलने हमासच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले.

या हल्ल्यात आतापर्यंत 3,785 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत आणि सुमारे 12,500 इतर जखमी झाले आहेत. तर, 1400 हून अधिक इस्रायली नागरिकांचाही यात मृत्यू झाला आहे.