अखंड अमेरिका...! डोनाल्ड ट्रम्प यांचा ड्रीम प्रोजेक्ट; 'या' ४ देशांवर लवकरच कब्जा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 16:04 IST2025-01-13T15:51:57+5:302025-01-13T16:04:30+5:30

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या २० जानेवारीला शपथ घेणार आहेत पण अधिकृतपणे देशाचा कारभार हाती घेण्यापूर्वीच त्यांनी अखंड अमेरिकेचा प्लॅनवर काम करणे सुरू केले आहे. त्यासाठी ते कॅनडा, ग्रीनलँड, पनामा कालवा आणि गल्फ ऑफ मॅक्सिको यांची निवड केली आहे.
निवडणुकीवेळी ट्रम्प यांनी MAGA म्हणजे 'मेक अमेरिका ग्रेट अगेन'चा नारा दिला होता. अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी त्याचा विस्तार गरजेचे आहे असं मानलं जाते. त्यासाठी ट्रम्प यांनी सर्वात आधी शेजारील देश कॅनडाला निवडलं. अखेर कॅनडाच का...असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
कॅनडा आणि अमेरिका यांच्या सीमा जोडलेल्या आहेत. कॅनडाच्या सीमेवरून बेकायदेशीर घुसखोर अमेरिकेत घुसतात आणि त्याने गुन्हेगारी वाढते असा आरोप ट्रम्प यांचा आहे. त्यामुळे अमेरिकेच्या पायाभूत सुविधांवर ताण येत असून देशात बेरोजगारी वाढली आणि त्यात सुरक्षेचा धोकाही निर्माण झाला आहे.
खलिस्तानी मुद्द्यावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो जागतिक स्तरावर एकटे पडलेत. त्याचमुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकेचे ५१ वा स्टेट म्हणून प्रोजेक्ट करणे सुरू केले आहे. ट्रुडो अमेरिकेत पोहचले तेव्हापासून याची सुरुवात झाली. याच दौऱ्यात ट्रम्प यांनी मस्करीत ट्रुडो यांना गवर्नर आणि कॅनडाला अमेरिकेचे ५१ वा स्टेट उल्लेख करण्याचं विधान केले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथवर आधी एक नकाशा शेअर केला. त्यामध्ये त्यांनी कॅनडा हा अमेरिकेचा भाग दाखवला आहे. त्यांनी हा नकाशा शेअर करत लिहिले की, ‘’ओह कॅनडा!’’, त्यानंतर त्यांनी आणखी एक नाकाशा शेअर केला. त्यावर लिहिलं की ‘’युनायटेड स्टेट’’, डोनाल्ड ट्रम्प हे कॅनडाचा अमेरिकेचं ५१ वं राज्य म्हणून वारंवार उल्लेख करत आहेत.
ट्रम्प यांच्या यादीत दुसरं नाव पनामा आहे. त्यांना पनामा कालव्यावर अमेरिकेचं वर्चस्व हवं. पनामा कालवा उत्तर आणि दक्षिणी अमेरिका महाबेटांना जोडतो. हा कालवा अटलांटिक आणि प्रशांत महासागर यांच्यात महत्त्वाचा व्यापारी मार्गही आहे. १९७७ पर्यंत या कालव्याचे नियंत्रण अमेरिकेकडेच होते.
१९७७ साली झालेल्या करारात निश्चित करण्यात आले की १९९७ पर्यंत अमेरिका याचे नियंत्रण पनामाला देईल. फक्त कालव्याच्या संरक्षणासाठी अमेरिकेचे सैन्य असेल. पनामा कालव्यात चीनी जहाजांची संख्या वाढत आहे आणि त्याशिवाय अमेरिकन जहाजांवरही पनामा अधिक टॅक्स लावतंय. त्यामुळे अमेरिकेची सुरक्षा आणि आर्थिक हितासाठी पनामावरील नियंत्रण पुन्हा मिळवावं असं ट्रम्प यांना वाटतं.
ट्रम्प यांच्या यादीत तिसरं नाव ग्रीनलँड आहे. ग्रीनलँड अमेरिकेसाठी खूप महत्त्वाचं आहे. जर डेनमार्क ग्रीनलँडला अमेरिकेत सहभागी होऊन देत नाही कारण त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टॅक्स लागेल. इतिहासात पाहिले तर ग्रीनलँड डेनमार्कचं आर्थिक केंद्र आहे. १९५३ साली त्यांना स्वातंत्र्य मिळाले परंतु हे पूर्ण स्वातंत्र्य नाही. ग्रीनलँड डेनमार्कचा भाग असला तरी त्याला त्यांचे सरकार चालवण्याचा अधिकार दिला आहे.
यादीत चौथं नाव मॅक्सिको आहे. गल्फ ऑफ मॅक्सिको नाव बदलून गल्फ ऑफ अमेरिका नाव हवं असा प्रस्ताव ट्रम्प यांनी ठेवला. मॅक्सिको अमेरिकेचा फायदा घेते, मात्र व्यापारात अमेरिकेला नुकसान सहन करावे लागते. मॅक्सिकोमधील गुन्हेगारी चिंतेचा विषय आहे. हा देश सरकार नाही तर ड्रग्स कार्टेल चालवतात, अशावेळी मॅक्सिकोची जबाबदारी अमेरिकेकडे हवी असं ट्रम्प सांगतात.
जर अमेरिकेला कॅनडा, ग्रीनलँड, पनामा कालवा आणि मॅक्सिको जोडले गेले तर त्याचे एकूण क्षेत्रफळ २.३४ कोटी वर्ग किलोमीटर होईल. त्यामुळे अमेरिका जगातील सर्वात मोठा देश बनेल. आता जगात सर्वात मोठा देश रशिया आहे त्याचे क्षेत्रफळ १.७० कोटी वर्ग किलोमीटर इतकं आहे.