mobile tower burned in britain after hoax claims 5G causes Coronavirus kkg
CoronaVirus: ...अन् त्या एका अफेवेमुळे लोकांनी पेटवले मोबाईल टॉवर By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 03:21 PM2020-04-04T15:21:41+5:302020-04-04T15:34:14+5:30Join usJoin usNext चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनानं युरोप आणि अमेरिकेत अक्षरश: थैमान घातलं आहे. जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ११ लाखांहून अधिक आहे. ५९ हजारपेक्षा अधिक जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. ब्रिटनमध्येही कोरोनाची दहशत पाहायला मिळते आहे. ब्रिटनमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३८ हजारांपेक्षा जास्त आहे. ब्रिटनमध्ये साडे तीन हजारांपेक्षा अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चिंताजनक बाब म्हणजे ब्रिटनमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनादेखील आता कोरोनाची लागण होऊ लागली आहे. त्यातच आता एका अफवेमुळे ब्रिटनमध्ये अडचणी आणखी वाढल्या आहेत. गेल्या काही तासांमध्ये ब्रिटनमधील काही शहरांमध्ये मोबाईल टॉवर पेटल्याच्या घटना घडल्या आहेत. ५ जी मोबाईल टॉवरमुळे कोरोना पसरत असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोबाईल टॉवर पेटल्याच्या घटना घडल्या. बर्मिंगहॅममधील मोबाईल टॉवर पेटवून दिल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांना त्यांच्या घराच्या परिसरात ५ जी मोबाईल टॉवर नको आहे. त्यामुळे कोणीतरी मोबाईल टॉवर पेटवला असल्यास मला त्याबद्दल जराही आश्चर्य वाटणार नाही, अशी माहिती बर्मिंगहॅममध्ये मोबाईल टॉवरजवळ राहणाऱ्या एकानं 'द इंडिपेंडंट'ला दिली. यानंतर मोबाईल युके संस्थेनं ५ जी मोबाईल टॉवरमुळे कोरोना पसरत असल्याचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं स्पष्ट केलं. मोबाईल युके संस्थेत थ्री, ओटू, ईई आणि व्होडाफोनचा समावेश आहे. ५ जीच्या मोबाईल टॉवरमुळे फुफ्फुसातील ऑक्सिजन खेचला जातो. त्यामुळे फुफ्फुसावर विपरित परिणाम होतो. माणसाची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते, असे दावे सोशल मीडियावर केले जात आहेत. वुहानमधून ५ जी सेवा सुरू झाली. तिथेच सर्वप्रथम कोरोनाचा विषाणू आढळून आला, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये करण्यात येत आहे. मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला असून ही केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus