षडयंत्र! 'मोसाद'चा तो एजेंट ज्यानं भारताशी गद्दारी केली; उल्फाला ६०० शस्त्रे दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 08:46 PM2023-11-23T20:46:53+5:302023-11-23T20:56:32+5:30

इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर जगातील सर्वात धोकादायक गुप्तचर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोसाद पुन्हा चर्चेत आली.हमासच्या हल्ल्यात १२०० इस्रायली लोक मारले गेले आणि हे मोसादचे सर्वात मोठे अपयश मानले जात आहे.मोसादचा इतिहास हत्येने आणि अनेक धाडसी मोहिमांनी भरलेला आहे. पण भारताविरुद्ध त्याचा धोकादायक षडयंत्राचा खुलासा उघड झाला आहे.

गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्याला भारताने विरोध केलेला नाही आणि पीएम मोदींनी हमासच्या हल्ल्याची तुलना दहशतवादी घटनेशी केली आहे. दोन्ही देशांमधील मैत्रीही सध्या चांगली आहे. या सगळ्यात भारताच्या आसाम राज्यात कार्यरत असलेल्या उल्फा या अतिरेकी गटाला मोसादच्या एजंटने ६०० रायफल आणि मशीन गनची पहिली खेप पुरवल्याचे एका पुस्तकात उघड झालं आहे.

एका इंग्लिश वृत्तपत्रानुसार, युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम अथवा उल्फा या दहशतवादी संघटनेला रोमानियामधून शस्त्रांची पहिली खेप मिळाली. हा करार भारतीय वंशाच्या एका व्यक्तीने केला होता जो कथितरित्या इस्रायली गुप्तचर संस्था मोसादसाठी काम करतो.

लवकरच प्रकाशित होणाऱ्या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे.'उल्फा: द मिराज ऑफ डॉन' या पुस्तकानुसार सिंगापूरमध्ये राहणारा हा मोसाद एजंट रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथे गेला होता. मोसाद एजंटसोबत उल्फा चीफ ऑफ स्टाफ परेश बरुआ आणि इतर दोन लोकही रोमानियाला गेले होते.

या करारांतर्गत, ULFA ला असॉल्ट रायफल, पिस्तूल, लाइट मशीन गन आणि स्फोटके देण्याचे मान्य करण्यात आले. ही संपूर्ण घटना १९९३ साली घडली जेव्हा भारतीय सुरक्षा यंत्रणा त्यांना अटक करू नयेत म्हणून उल्फा एजंट आसाममधून बांगलादेशात पळून गेले होते. ही घटना २००४ च्या चितगाव प्रकरणाशी संबंधित नाही ज्यात १० ट्रक शस्त्रास्त्रे उल्फाला दिली जाणार होती.हे शस्त्र बांगलादेशच्या सुरक्षा यंत्रणांनी जप्त केले आहे.

हे पुस्तक ज्येष्ठ पत्रकार राजीव भट्टाचार्य यांनी अनेक वर्षांच्या रिसर्चनंतर लिहिले आहे. या पुस्तकात उल्फाच्या विदेशी तळांची माहिती देण्यात आली आहे. उल्फा पाकिस्तान, भूतान, बांगलादेश, म्यानमार आणि चीनमधून आपल्या कारवाया चालवत असे. एक दशकापूर्वी उल्फामध्ये फूट पडली होती आणि त्याचा एक प्रमुख कमांडर अरविंद राजखोवा याला बांगलादेशने भारताच्या ताब्यात दिले होते.

मोसाद एजंटने उल्फासाठी केलेल्या शस्त्रास्त्रांच्या व्यवहारासाठी परेश बरुआने संपर्क साधला होता. सिंगापूरमध्ये त्याला भारतीय वंशाचा मोसाद एजंट भेटला ज्याचे पालक तामिळनाडूतून तिथे स्थलांतरित झाले होते. त्याचा मोसादशी खूप जवळचा संबंध होता.शस्त्रास्त्रांचे सौदे करून तो लाचही कमवत असे.बांगलादेशात असलेल्या दोन उल्फा दहशतवाद्यांनी या मोसाद एजंटची माहिती दिली आहे.परेश बरुआ याने स्वत:रोमानियामध्ये परराष्ट्र सचिवांची भेट घेतल्याचे समोर आले आहे.

उल्फा आणि रोमानिया यांच्यात एक करार झाला ज्या अंतर्गत परेश बरुआला ६०० शस्त्रे पाठवण्यात आली. ही शस्त्रे एका जहाजातून बांगलादेशच्या चितगाव बंदरात पाठवण्यात आली होती जिथे उल्फा कमांडर राहत होते. त्यानंतर भविष्यात आणखी शस्त्रास्त्रे खरेदी करता यावीत म्हणून उल्फा प्रमुखाने मोसादच्या भारतीय एजंटसोबत युक्रेनचा प्रवास केला.

परदेशातून येणारी शस्त्रे बंदरात पोहोचण्यापूर्वी समुद्रात उतरवता यावीत म्हणून उल्फा प्रमुखाने बांगलादेशच्या आत एका लहान जहाजाची व्यवस्था केली. मग ते गुपचूप बांगलादेशच्या आत नेले जावे. मोसादचा हा एजंट उल्फा सदस्यांसह एका छोट्या जहाजात समुद्रातही हजर होता. हे जहाज बंदरात पोहोचले आणि पोलिसांनी ते जप्त केले. त्यामुळे उल्फाच्या प्लॅनिंगला मोठा धक्का बसला.

तो मोसाद एजंट बांगलादेशातून सिंगापूरला पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र, काही महिन्यांनी तो 'बेपत्ता' झाला. पुन्हा कधीही त्याचा पत्ता लागला नाही. भारतातील दहशतवादी गटाला शस्त्रे पुरवण्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती असं बांगलादेशात उपस्थित असलेल्या उल्फा सदस्यांचा दावा होता.