आता आफ्रिकन देशात पसरतोय रहस्यमय आजार; खाज, जळजळीने रुग्ण होताहेत बेजार By बाळकृष्ण परब | Published: November 22, 2020 10:38 AM 2020-11-22T10:38:37+5:30 2020-11-22T10:41:44+5:30
International News : पश्चिम आफ्रिकेमधील सेनेगल देशातील डकारच्या समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या पाचशेहून अधिक मच्छिमारांना त्वचेसंबंधीचा गंभीर आजार झाल्याचे समोर आले आहे. सध्या जगभरात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. यादरम्यान जगातील विविध भागातून अनेक रहस्यमय आणि धोकादायक आजारांच्या उद्रेकाच्याही बातम्या येत असतात. आता पश्चिम आफ्रिकेमधील सेनेगल देशातील डकारच्या समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या पाचशेहून अधिक मच्छिमारांना त्वचेसंबंधीचा गंभीर आजार झाल्याचे समोर आले आहे.
रॉयटर्सने दिलेल्या एका वृत्तानुसार, आरोग्य आणि शिक्षणासंबंधीच्या राष्ट्रीय संचालकांनी सांगितले की, डकारच्या आसपास येणाऱ्या मच्छिमारांना हा आजार दिसून आल्यानंतर क्वारेंटिन कण्यात आले आहे. सध्या या सर्व मच्छिमारांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजाराचाही तपास केला जात आहे. लवकरच या रहस्यमय आजाराबाबत माहिती समोर येईल.
समोर येत असलेल्या माहितीनुसार त्वचेसंबंधीच्या या आजाराचा पहिला रुग्ण १२ नोव्हेंबर रोजी दिसून आला होता. तेव्हा समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या एका २० वर्षीय युवकाच्या शरीरावर जळजळीसह खाज येत असल्याचे दिसून आले होते.
मात्र त्यानंतर मच्छिमारांमध्ये मोठ्या प्रणाणावर हा आजार दिसून आल्यानंतर हे प्रकरण गंभीर असल्याचे दिसून आले. आरोग्याशी संबंधीत अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सुमारे ५०० मच्छिमारांमध्ये हा आजार दिसून आला आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, या सर्व मच्छिमारांची देखभाल केली जात आहे. या आजाराच्या प्राथमिक लक्षणांची तपासणी केली जात आहे. तसेच या मच्छिमारांच्या माध्यमातून हा आजार अन्य कुणापर्यंत पोहोचू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.