नरेंद्र मोदी करणार होते इस्लामाबाद दौरा, जवळपास सगळं ठरलं, पण अचानक...; पाकिस्तानी पत्रकाराचा मोठा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 10:07 AM 2023-01-18T10:07:33+5:30 2023-01-18T10:30:39+5:30
पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे, त्यामुळे त्यांनी काश्मीरचा मुद्दा आता बाजूला टाकला पाहिजे. भारत-पाकिस्तानशी संबंधित अशा गोष्टींचा खुलासा यात करण्यात आला आहे, जो आतापर्यंत करण्यात आलेला नव्हता. सर्व बाजूंनी संकटाने घेरलेल्या पाकिस्तानचा भारताबाबतचा दृष्टिकोन मवाळ होताना दिसत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नुकतंच म्हटलं आहे की, दोन्ही शेजाऱ्यांनी शांततेने राहावे आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मात्र, शाहबाज यांनी काश्मीर प्रश्नाचा पुन्हा उल्लेख केला आणि काश्मीरमधील मानवाधिकारांचे उल्लंघन थांबले पाहिजे, असं म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारा लेख प्रकाशित केला होता त्यानंतर पाकिस्तानी मीडियाने आता शाहबाज शरीफ सरकारला सल्ला दिला आहे की पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा आता बाजूला ठेवावा आणि आता आपलं घर सांभाळलं पाहिजे.
परराष्ट्र प्रकरणांतील जाणकार पत्रकार कामरान युसूफ यांचा एक ओपिनिअन लेख पाकिस्तानातील प्रमुख वृत्तपत्र द एक्स्प्रेस ट्रिब्यूनमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये त्यांनी पाकिस्तान सरकारला काश्मीरबाबत सल्ला दिला आहे.
युसुफ यांनी नुकतीन पाकिस्तानचे सेवानिवृत्त जनरल कमर जावेद बाजवा यांची भेट घेतले. यादरम्यान त्यांना भारत पाक संबंधांतील अशा अनेक गोष्टींची माहिती मिळाली ज्या सार्वजनिक करण्यात आलेल्या नाही. लेखात युसुफ यांनी त्या सर्व बाबींचा उल्लेख केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२१ मध्ये दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करायचा होता असं त्यात नमूद करण्यात आलंय.
“तत्कालिन डीजी आयएसआय लेफ्टनंट जनरल फैज हमीद आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या बॅकचॅनल चर्चा झाली. त्यानंतर पंतप्रधानांच्या पाकिस्तान दौऱ्याची योजना झाली. चर्चांमुळे फेब्रुवारी २०२१ मध्ये दोन्ही देशांमध्ये सीझफायरच्या कराराचं नूतनीकरण करण्यात आलं. ही घोषणा आश्चर्यकारक होती कारण दोन्ही देशांमध्ये कोणतीही औपचारिक चर्चा होत नव्हती. अनेक वर्षानंतर दोन्ही देशांनी एकत्र निवेदन जारी केलं,” असं त्यांनी लेखात नमूद केलंय.
“२०१९ मध्ये भारतानं एकतर्फी निर्णय घेत जम्मू काश्मीरच्या विशेष राज्याचा दर्जा काढून टाकला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला. पाकिस्ताननं प्रतिक्रिया म्हणून राजनैतिक संबंध कमी केले आणि भारतासोबत द्विपक्षीय व्यापारही बंद केला. अशा परिस्थितीत दोन्ही देशांमध्ये सीझफायरची घोषणा आश्चर्यकारक होती,” असं युसुफ आपल्या लेखात म्हणतात.
या नव्या करारानंतर विश्वास प्राप्त करण्याच्या उपयांतर्गत दोन्ही देशांमध्ये मार्चमध्ये व्यापार संबंध पुन्हा सुरू करायचे होते. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तान दौरा निर्धारित करण्यात आला होता असंही त्यांनी नमूद केलं.
“परंतु ना व्यापार पुन्हा सुरू झाला ना पंतप्रधान मोदींचा पाकिस्तान दौरा होऊ शकला. याचं कारण हे होतं की तत्कालिन पंतप्रधान इम्रान खान यांना इशारा देण्यात आलेला की असं झाल्यात पाकिस्तानातील लोक रस्त्यावर उतरतील आणि त्यांना लोकांच्या रोषाचा सामना करावा लागेल,” असं युसुफ यांनी म्हटलंय.
“कथितरित्या इम्रान खान यांना मोदींच्या दौऱ्यादरम्यान २० वर्षांपर्यंत काश्मीर वाद थांबवण्याचा सल्ला दिला होता. यासाठीच इम्रान खान यांचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी त्यांना इशारा दिला की अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टींकडे काश्मीर विकण्याच्या प्रकारे पाहिलं जाईल. यासाठीच ही योजना एक स्वप्न बनून राहिलं,” असं त्यांनी आपल्या लेखात म्हटलंय. त्यांनी आपल्या लेखात काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख केला. पाकिस्तान अटल बिहारी वाजपेयी यांच्या लाहोर दौऱ्यादरम्यान काश्मीरबाबत एक चांगला करार होऊ शकला असता असंही म्हटलं.
२००४ ते २००७ पर्यंत शांतता प्रक्रियेला काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी आशादायक मानलं गेलं. परंतु नंतर पाकिस्तानातील लष्करी शासन संपलं. त्यानंतर मुंबईतील बॉम्ब स्फोटानं दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा वाढवल्याचं त्यांनी लेखात म्हटले.
अनेक वर्षांनंतर दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न झाले होते, पण तोवर भारत अमेरिकेच्या जवळ गेला होता आणि त्यानं आर्थिक प्रभाव मजबूत केला होता. यानंतर काश्मीरवर भारताची भूमिका अजून कठोर होत गेल्याचे युसुफ यांनी आपल्या लेखात पुढे म्हटलेय.
“जेव्हा भारत आर्थिक प्रगती करत होता, तेव्हा पाकिस्तान एकामागून एक संकटाचा सामना करत होता हे विसरायला नको. यामुळेच जनरल बाजवा यांनी आर्थिक प्रगतीसाठी भारतासोबत शांतता कायम ठेवणं आवश्यत असल्याचा विचार केला. अनेकांना ही गोष्ट खटकू शकते पण सध्या पाकिस्तानला काश्मीरवर चर्चा थांबवायला हवी आणि पहिले आपला देश सांभाळायला हवं,” असंही युसुफ यांनी आपल्या लेखाच्या अखेरिस म्हटलेय.