CoronaVirus: माऊंट एव्हरेस्टवर १०० जणांना कोरोनाची लागण? गाइडचा दावा, नेपाळ सरकारचा इन्कार By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 05:28 PM 2021-05-24T17:28:43+5:30 2021-05-24T17:38:49+5:30
CoronaVirus: गिर्यारोहक आणि त्यांच्या साथीदारांना करोनाची लागण झाल्याचा दावा एका गाइडने केला आहे. मात्र, नेपाळ सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे. (Mount Everest) काठमांडू: गेल्या काही दिवसांपासून भारतासह शेजारील देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नेपाळमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत.
जागतिक पातळीवरील अनेक देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली असून, भारतातही या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यातच आता जगातील सर्वांत उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवरही कोरोनाचा शिरकाव झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
गिर्यारोहक आणि त्यांच्या साथीदारांना कोरोनाची लागण झाल्याचा दावा एका गाइडने केला असून, नेपाळ सरकारने मात्र हा दावा फेटाळून लावल्याचे सांगितले जात आहे.
एव्हरेस्ट चढण्यासाठी नेपाळ सरकारने आतापर्यंत ४०८ गिर्यारोहकांना परवानगी दिली आहे. कॅम्पमध्ये शेरपा गाइड आणि सहकारी त्यांच्या मदतीसाठी आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर गेल्या वर्षी मार्च महिन्यापासूनच चीनमार्गे होणारी एव्हरेस्टवरील चढाई बंद करण्यात आली आहे. मात्र, आता एव्हरेस्ट शिखरावरील गिर्यारोहकांना कोरोनाची लागण झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
शिबिरात काही जण आजारी पडले आहेत. तर काही जण खोकत असताना दिसत आहेत. त्यामुळे बेस कॅम्पमध्ये कमीत कमी १०० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसत आहे. ही संख्या १५० ते २०० वर जाऊ शकते, असे लुकास फुरटेनबॅक यांनी म्हटले आहे.
लुकास फुरटेनबॅक हे ऑस्ट्रियाचे गाइड, गिर्यारोहक आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपले एव्हरेस्ट अभियान स्थगित केले आहे. एक परदेशी गाइड आणि ६ नेपाळी शेरपा गाइड यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
आपण पुराव्यानिशी ही बाब बोलत असल्याचे लुकास फुरटेनबॅक यांनी सांगितले. मात्र, नेपाळ सरकारने यासंदर्भातील दावे फेटाळल्यानंतर नेमके खरे कोण बोलत आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर गेल्यावर्षी मार्च महिन्यापासूनच चीनने गिर्यारोहकांना परवानगी नाकारली आहे. त्यानंतर नेपाळनेही गिर्यारोहकांवर बंदी घातली होती. मात्र, काही काळापूर्वी ही बंदी नेपाळने उठवली.
नेपाळमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत ६ हजार ३४६ जणांचा मृत्यू झाला आहे. जगात कोरोनाची साथ पसरल्यानंतर नेपाळमध्ये आतापर्यंत ५ लाख १३ हजार २४१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ३ लाख ९१ हजार ३४८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.