"चीनकडून लाच घेतायत नेपाळचे पंतप्रधान ओली, स्विस बँकेच्या खात्यात ठेवले आहेत कोटीच्या कोटी" By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 05:18 PM 2020-07-14T17:18:42+5:30 2020-07-14T17:28:09+5:30
नेपाळच्या पंतप्रधानांवर चीनकडून कोट्यवधी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. चीन सरकार नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना मिलियन डॉलर्समध्ये लाच देत असल्याचे म्हटले जात आहे. ओली यांच्या जेनेव्हा बँक खात्यात तब्बल 41. 34 कोटी रुपये जमा आहेत. चीन याच पद्धतीने नेपाळ सरकारला भारताविरोधात भडकवण्याचे काम करत आहे.
चीन आपल्या शेजारच्या गरीब अर्थव्यवस्था असलेल्या देशांतील भ्रष्ट नेत्यांना आपल्या बाजूला वळवून भारताविरोधात कट कारस्थान करत आहे. ग्लोबल वॉच अॅनालिसिसच्या नुकत्याच आलेल्या रिपोर्टमध्ये यासंदर्भात दावा करण्यात आला आहे. नेपाळमध्ये केपी शर्मा ओली यांच्या माधमाने चीनने आपले बस्तान बसवले आहे, असे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
या रिपोर्टनुसार, ओलींची संपत्ती गेल्या काही वर्षांत अनेक पटींनी वाढली आहे. त्यानी बाहेरच्या अनेक देशांत संपत्तीदेखील खरेदी केली आहे. या बदल्यात ओली यांनी चीनला नेपाळमध्ये आपला बिझनेस प्लॅन लागू करण्यात मदत केली आहे.
ग्लोबल वॉच अॅनालिसिसच्या रिपोर्टनुसरा, नेपाळचे पंतप्रधान ओली यांचे स्वित्झर्लंडमधील जेनेव्हा येथील मिरबॉड बँकेतही खाते आहे. या खात्यात जवळपास 41.34 कोटी रुपये आहेत.
या बँकेत केपी ओली यांनी आपले पैसे, लाँग टर्म डिपॉजिट आणि शेअर्सच्या स्वरुपात जमा केले आहेत.
या खात्यात पैसे ठेवल्यामुळे ओली आणि त्यांची पत्नी राधिका शाक्य यांना दरवर्षी जवळपास 2 कोटी रुपयांचा फायदाही होत आहे. ग्लोबल वॉच अॅनालिसिसनुसार, ओली यांनी 2015-16च्या आपल्या पहिल्या कार्यकाळातही कंबोडियाच्या दुरसंचार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले होते.
त्यावेळी नेपाळमधील चिनी राजदूत वू चुन्टाई यांनी ओली यांना बरीच मदत केली होती. हा व्यवहार ओलींचे निकटवर्तीय व्यवसायिक अंग शेरिंग शेरपा यांनी करून दिला होता. या व्यवहारात कंबोडियाचे पंतप्रधान हू सेन आणि चीनचे अधिकारी बो जियांगेओदेखील सहभागी होते.
ओली यांनी सरकार आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करत डिसेंबर 2018 मध्ये डिजिटल अॅक्शन रूम तयार करण्याचा ठेकादेखील चीनची कंपनी हुवावेला दिला होता. मे 2019 मध्ये नेपाळ टेलीकम्युनिकेशनने हाँगकाँग येथील चिनी कंपनीसोबत रेडिओ अॅक्सेस नेटवर्क तयार करण्याचा करार केला होता.
यावर्षी चीनची कंपनी जेटीईसोबत 4 जी नेटवर्कसाठी करार करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी 1 हजार 107 कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. ओली यांना यावरूनही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोधाचा सामना करावा लागत होता.
याशिवाय, नेपाळने चीनकडून 621 कोटी रुपयांच्या पीपीई किट आणि टेस्टिंग किट खरेदी केले होती. त्यांपैकी बहुतांश खराब निघाल्या होते. तसेच त्यांची किंमतही अधिक होती. यावरून नेपाळमधील विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले होते. याप्रकरणी नेपाळचे आरोग्यमंत्री आणि ओली यांच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरू आहे.