Kim Jong Un : किम जोंग उनची प्रकृती बिघडली! एक महिन्यापासून हुकूमशहा 'गायब', पण... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 06:09 PM 2021-11-13T18:09:08+5:30 2021-11-13T18:18:33+5:30
North korean dictator kim jong un : देशातील सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, किम जोंग 12 ऑक्टोबरला शेवटचा दिसला होता. याच्या एक दिवस आधी तो राजधानी प्योंगयांगमध्ये क्षेपणास्त्र प्रदर्शनाला उपस्थित होता. उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) पुन्हा एकदा गायब झाला आहे. एका महिन्याहून अधिक काळापासून किम जोंग सार्वजनिकरित्या दिसलेला नाही. यामुळे किंम जोंग उन पुन्हा आजारी पडल्याची अफवा तीव्र झाली आहे.
किम जोंग 2014 नंतर आताच सर्वाधिक काळ बेपत्ता झाला आहे. तेव्हा किम सार्वजनिक ठिकाणीही दिसला नाही आणि स्वतःला देशाच्या कामकाजापासून दूर ठेवले होते. यानंतर, सहा आठवड्यांच्या अनुपस्थितीनंतर, तो पुन्हा लोकांमध्ये परतला होता.
देशातील सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, किम जोंग 12 ऑक्टोबरला शेवटचा दिसला होता. याच्या एक दिवस आधी तो राजधानी प्योंगयांगमध्ये क्षेपणास्त्र प्रदर्शनाला उपस्थित होता. मात्र, यानंतर किमच्या दिसण्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आतापर्यंत उत्तर कोरियात झालेल्या कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात किम दिसलेला नाही.
वाशिंग्टनमधील वॉचडॉग वेबसाइट एनके न्यूजनुसार, सॅटेलाइट छायाचित्रांमध्ये किमच्या, देशातील पूर्वेकडील किनाऱ्यावरील घर आणि प्योंगयांगमध्ये एका सरोवराच्या काठावरील घराच्या जवळपास वेगवान हालचाली दिसून आल्या आहेत.
माध्यमांतील वृत्तानुसार, हुकूमशहा किम जोंग आजारी पडल्यानंतर या घरांमध्येच वेळ घालवतो. ऑक्टोबर अखेरीस किमला वॉन्सन बीचच्या घराजवळील तलावात बोट चालवताना दिसला होता.
'गायब' असूनही काम करतोय हुकूमशहा - येथील सरकारी माध्यमांनी म्हटले आहे, की किम जोंग सार्वजनिकरित्या दिसत नसला तरी सातत्याने काम करत आहे आणि या काळात त्याने इतर राष्ट्रप्रमुखांनाही पत्र लिहिली आहेत.
उत्तर कोरियाचे सैन्य त्यांच्या कार्यांत व्यस्त आहे. त्यांनी अनेक चाचण्या केल्या आहेत. चाचण्यांतील एक मिसाईल हे पहिले हायपरसोनिक मिसाईल आहे, असा दावा करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत किम जोंग गायब झाला आहे. खरे तर, उत्तर कोरियाने संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावाचे उलंघण करत बॅलिस्टिक मिसाइल्सची टेस्ट केली आहे.
यावर्षी तब्बल आठ वेळा गायब झालाय किम जोंग - मानले जाते की, किम जोंग उन गंभीर आजारी नसेल, तर तो पुढील महिन्यात सर्वांना दिसेल. कारण, त्याचे वडील किम जोंग-इल यांची 17 डिसेंबरला पुण्यतिथी आहे आणि त्यांच्या समाधीला वार्षिक भेट देण्यासाठी तो नक्कीच सर्वांसमोर येईल.
2021 मध्येच 37 वर्षीय किम कमित कमी 14 दिवसांपर्यंत तब्बल आठ वेळा गायब झाला आहे. किम नेहमीच लोकांतून गायब होत असतो.