किम जोंग उन यांची 'स्पेशल' ट्रेन दिसली; Satelite Camera ने टिपली!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 10:38 AM2020-04-26T10:38:05+5:302020-04-26T10:52:40+5:30

गेल्या दिवसांपूर्वी उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांच्यावर कार्डियोवेस्क्युलेरची शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली असल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. परंतु किम जोंग उन यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगत दक्षिण कोरियाने या वृत्ताचे खंडन केले होते.

उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती असतानाच चीनमधील डॉक्टरांचे एक पथक उत्तर कोरियाला रवाना झाले असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत.

किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबतच्या उलटसुलट चर्चा, दावे सुरूच आहेत. दक्षिण कोरियातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, किम जोंग उन हे जिवंत असून लवकरच लोकांसमोर येणार आहेत. किम जोंग उन हे लोकांसमोर येत नाहीत, याचा अर्थ त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, असा अर्थ होत नाही असेही या अधिकाऱ्याने सांगतिले.

दरदिवशी किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत विविध बातम्या येत आहेत. तसेच ह्यंग सॅन येथे किम जोंग उन यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमधील रुग्णालयात किम जोंग उनवर उपचार का केले नाहीत, असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.

किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत उलट सूलट चर्चा सुरु आहे. मात्र त्यातच आता किम जोंग उन यांच्या मालकीची असलेली खास ट्रेन उत्तर कोरियामध्ये 'रिसॉर्ट' परिसरात असल्याचे सांगण्यात येत आहे.

वॉशिंग्टनमधील उत्तर कोरियाच्या मॉनिटरींग प्रकल्पाद्वारे सॅटेलाइटच्या फोटोनूसार, किम जोंग उन यांची ट्रेन उत्तर कोरियामधील रिसॉर्ट परिसरात उभी असल्याचे दिसून येत आहे

मॉनिटरिंग प्रोजेक्ट '38 नॉर्थ' ने दावा केला आहे की, २१ एप्रिल आणि २३ एप्रिलला किम जोंग उन यांची खास ट्रेन वोन्सानच्या “लीडरशिप स्टेशन”वर उभी होती.

किम जोंग उन यांच्या परिवारमधील सदस्यांच्या वापरासाठी लीडरशिप स्टेशन आरक्षित आहे. परंतु ट्रेन या रिसॉर्ट परिसरात दिसून आली तरी देखील किम जोंग याच ठिकाणी आहेत की नाही याची अजूनही खात्री पटलेली नाही.

किम जोंग उन यांचे वडिल किम जोंग इल यांच्याबाबतही अशाच प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. उत्तर कोरियाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त ते गैरहजर होते. त्यावेळी ही उलटसुलट चर्चा सुरू होत्या.

मात्र, त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याचे समोर आले होते. अखेर किम जोंग इल यांचे २०११ मध्ये निधन झाले. त्यानंतर किम जोंग उन यांच्या हाती उत्तर कोरियाच्या सत्तेची सूत्रे आली.