आता चक्क दगड हेरगिरी करणार, शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणार, रशियाने विकसित केले अदभूत यंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 12:57 PM2021-12-01T12:57:55+5:302021-12-01T13:00:54+5:30

Russia developed Spy Rock : लष्करी रणनीतीमध्ये हेरगिरीचे खूप महत्त्व असते. त्यामाध्यमातून शत्रूचा शोध घेतला जातो. आता रशियाने शत्रूचा शोध घेण्यासाठी एक खास प्रकारचा हेरगिरी करणारा दगड विकसित केला आहे.

लष्करी रणनीतीमध्ये हेरगिरीचे खूप महत्त्व असते. त्यामाध्यमातून शत्रूचा शोध घेतला जातो. आता रशियाने शत्रूचा शोध घेण्यासाठी एक खास प्रकारचा हेरगिरी करणारा दगड विकसित केला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने याला दुजोरा दिला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या टीव्ही चॅनेलने सांगितले की, हा खास प्रकारचा हेरगिरी करणारा दगड आहे. तो शत्रूच्या स्थितीप्रमाणे आपली पोझिशन बदलतो. त्यामुळे हा दगड युद्धाच्या स्थितीमध्ये खूप काम करता येऊ शकते.

रशियन संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार शत्रूची माहिती घेण्यासाठी या हेरगिरी करणाऱ्या दगडामध्ये एक छोटासा कॅमेरा लावण्यात आला आहे. तो फोटो घेऊ शकेल. त्याशिवाय या दगडाला चाके लावण्यात आली आहेत. हा दगड कशाप्रकारे काम करतो हे संरक्षण मंत्रालयाने एका व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगितले आहे. हा कॅमेरा मॉस्को मिलिट्रीच्या संशोधकांनी शत्रूचा सामना करण्यासाठी तयार केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हेरगिरी करणाऱ्या दगडाला दीड किमी अंतरावर बसलेली व्यक्ती रेडिओ सिग्नलच्या माध्यमातून ऑपरेट करते. परिस्थितीनुसार ऑपरेटर कॅमेऱ्याला शत्रूच्या नजरेतून हटवू शकतो. तसेच शत्रूच्या हालचाली दिसतील अशा ठिकाणी सेट करू शकतो.

हा हेरगिरी करणारा दगड तयार करणाऱ्या एअरफोर्स अॅकॅडमीच्या डिझायनरने सांगितले की, हा दगड तुमचा आवाज ऐकून रिअॅक्टसुद्धा करू शकतो. अधिकृतरीत्या त्याचे नाव ऑब्झर्वेशन कॉम्प्लेक्स असे ठेवण्यात आले आहे. मात्र त्याला सामान्य भाषेमध्ये स्पाय रॉक म्हणजेच हेरगिरी करणारा दगड असेही म्हटले जाते. हा दगड तयार करण्याची कल्पना ही ब्रिटिश सुपर स्टोनच्या माध्यमातून आली होती. त्याचा वापर रशिया हेरगिरीसाठी करायचा.

संरक्षण मंत्रालयाच्या टीव्ही चॅनेलने दावा केला की, या हेरगिरी करणाऱ्या दगडाच्या माध्यमातून शत्रूच्या हालचालींवर लांबून नजर ठेवता येऊ शकेल. तसेच हेरगिरी करणाऱ्या दगडाकडून मिळालेल्या माहितीनुसार लष्कराचे जवान आपल्या रणनीतीमध्ये बदल करू शकतील. तसेच परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकतील.