Omicron Variant : ओमायक्रॉनची दहशत! अमेरिकेत पुन्हा निर्माण होऊ शकते भीषण परिस्थिती; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 11:49 AM2021-12-20T11:49:57+5:302021-12-20T12:31:09+5:30

Omicron Variant : ओमायक्रॉनची सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे त्याचा वेगवान प्रसार. या प्रकाराच्या संसर्गाचा प्रसार इतर प्रकारांपेक्षा अनेक पटीने जास्त आहे.

जगभरातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनचं भयंकर रुप पाहायला मिळत आहे. ब्रिटन, अमेरिकेसारख्या देशांमध्ये ओमायक्रॉनचा कहर सुरू झाला आहे. कोरोनामुळे अमेरिकेत पुन्हा एकदा भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, डेल्टा व्हेरिएंटने अमेरिकेत कहर केला आहे. ओमायक्रॉनही आता त्याच मार्गावर आहे, अनेक देशांमध्ये नवा व्हेरिएंट धुमाकूळ घालत असून रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे.

ओमायक्रॉनची सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे त्याचा वेगवान प्रसार. या प्रकाराच्या संसर्गाचा प्रसार इतर प्रकारांपेक्षा अनेक पटीने जास्त आहे. हे एकमेव कारण आहे जे ते अधिक धोकादायक बनवते.

ओमायक्रॉन अत्यंत प्रकार वेगाने पसरत आहे असल्याने चिंता वाढली आहे. विशेषत: अमेरिकेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अमेरिकेत दुसऱ्या लाटेत एका दिवसात तब्बल दोन लाख मृत्यूची नोंद झाली आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत 45 टक्के आणि प्रकरणांमध्ये 40 टक्के वाढ झाली आहे. आता एका आरोग्य तज्ज्ञाने असा इशाराही दिला आहे की अमेरिकेतील लोक कोरोनाच्या पुढच्या लाटेकडे जात आहेत.

ओमायक्रॉनशी लढा देण्यासाठी बूस्टर शॉट्सबाबत बोलताना कार्डियोलॉजिस्ट आणि स्क्रिप्स रिसर्च ट्रान्सलेशनल इन्स्टीट्यूटचे संस्थापक डॉ. एरिक टोपोल यांनी CNBC ला सांगितले की अमेरिकन लोक कोरोना व्हायरसच्या वेगाने पसरणाऱ्या व्हेरिएंटसाठी तयार नसतील.

अमेरिकन जनतेला या धोक्यातून बाहेर काढण्यासाठी काय आवश्यक आहेत त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण आम्ही अजूनही थोडे मागे आहोत. पूर्ण लसीकरणाचा अर्थ दोन नव्हे तर तीन डोस असा आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे सर्वोच्च वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौसी यांनीही त्यांच्या टीकेचे समर्थन केले. रविवारी सीएनबीसीशी बोलताना फौसी म्हणाले की लसीकरणाच्या दोन्ही डोसनंतरही बूस्टर शॉट आवश्यक आहे यात शंका नाही.

फौसी यांनी याचदरम्यान लोकांना बूस्टर शॉट घेण्याचे आवाहन केले आणि ज्यांना अद्याप कोरोना लसीचा दुसरा डोस मिळालेला नाही त्यांच्यासाठी संपूर्ण लसीकरण करावे असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

शनिवारी फक्त न्यूयॉर्कमध्ये 22,000 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी ट्रॅकरच्या म्हणण्यानुसार, गेल्या मंगळवारपर्यंत अमेरिकेमध्ये 8 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या ही अमेरिकेत आहे. तेथे आतापर्यंत तब्बल आठ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ओमायक्रॉनने थैमान घातलेले असताना हा आकडा अत्यंत धडकी भरवणारा आहे.

अमेरिकेमध्ये तब्बल 78 हजार नवे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. साधारण वर्षभरानंतर पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये कोरोना हा वृद्धांसाठी काळ ठरत असल्याचं समोर आलं आहे.

वृद्ध लोकांसाठी कोरोना अधिक खतरनाक आणि जीवघेणा आहे. आठ लाख कोरोना मृतांपैकी जवळपास 75 टक्के म्हणजेच सहा लाख लोक हे 65 वर्षांवरील आहेत. यातून कोरोना किती घातक असल्याचं स्पष्ट होत आहे.

अमेरिकेतील तब्बल 20 कोटींहून अधिक लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉनमुळे कोरोनाच्या आणखी एका लाटेचा धोका असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे लसीकरणावर अधिक भर हा दिला जात आहे.

ओमायक्रॉनचा सर्वाधिक फटका हा ब्रिटनला बसला असून तेथील परिस्थिती ही अत्यंत भीषण आहे. रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण हे आता तिपटीने वाढलेले पाहायला मिळत आहेत.