कोरोना काळात पाकिस्तानला लॉटरी; ९ महिन्यांच्या मेहनतीनंतर मोठा खजिना हाती By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 03:10 PM 2020-07-16T15:10:46+5:30 2020-07-16T15:15:20+5:30
कोरोना संकटाच्या काळात पाकिस्तानला मोठी लॉटरी लागली आहे. खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा मोठा खजिना पाकिस्तानच्या हाती लागला आहे.
खैबर पख्तुनख्वामधल्या ताल ब्लॉक येथील मामीखेल भागात पाकिस्तानला खनिज तेलाचं भांडार सापडलं आहे. त्यामुळे पाकिस्तानचं ऊर्जा क्षेत्रातलं अवलंबित्व कमी होणार आहे.
भारताप्रमाणे पाकिस्तानदेखील मोठ्या प्रमाणात खनिज तेलाची आयात करतो. यावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. मात्र आता देशात खनिज तेलाचा साठा सापडल्यानं पाकिस्तानला मोठा दिलासा मिळाला आहे.
खैबर पख्तुनख्वामध्ये सापडलेल्या तेलसाठ्याची माहिती पाकिस्तान ऑनफिल्ड्स लिमिटेडनं (पीओएल) काल पाकिस्तान शेअर बाजाराला नोटिफिकेशनच्या माध्यमातून दिली.
खैबर पख्तुनख्वामधून दररोज ३२४० बॅरल खनिज तेल आणि १६.१२ मिलियन स्टँडर्ड क्बुबिक फूट गॅस काढला जाऊ शकतो, अशी माहिती तेल आणि वायू विहिरींच्या परिक्षणातून समोर आली आहे.
पाकिस्तानात मार्च २०२० मध्ये दर दिवशी ८५ हजार बॅरल तेलाचं उत्पादन करण्यात आलं. भारताप्रमाणेच पाकिस्तान ८० टक्के खनिज तेल आयात करतो.
पाकिस्तानात दर दिवशी ४ अब्ज क्युबिक फूटपेक्षा कमी गॅसचं उत्पादन करतो. पाकिस्तानला दर दविशी ७ अब्ज क्युबिक फूट गॅसची आवश्यकता असते. त्यामुळे पाकिस्तानला नैसर्गिक वायूदेखील आयात करावा लागतो.
पाकिस्तानच्या सांख्यिकी विभागानं दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान आपल्या उर्जाविषयक गरजा भागवण्यासाठी ९.८ अब्ज डॉलरचं इंधन आयात करतो. देशाच्या आयातीचा एकूण एक चतुर्थांश खर्च इंधनावर खर्च करण्यात येतो.
पाकिस्ताननं गेल्या जुलै महिन्यापासून ते यंदाच्या मेपर्यंत ४०.८६ अब्ज डॉलरची आयात केली आहे. खैबर पख्तुनख्वामधील मामीखेल दक्षिण-०१ मध्ये ऑक्टोबर २०१९ मध्ये खोदकाम सुरू झालं. २३ मे २०२० पर्यंत ४९३९ मीटर खोदकाम झाल्यानंतर हायड्रोकार्बन सापडलं.
वर्षभरापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानात आशियातला सगळा मोठा इंधन खजिना सापडेल अशी आशा व्यक्त केली होती. यामुळे देशाचं भविष्य बदलेल, असं खान म्हणाले होते. मात्र केकरा-१ मध्ये ६ हजार फूट खोदकाम करूनही खनिज तेल हाती लागलं नाही.