Pakistan PM Imran Khan:क्रिकेटचे मैदान ते राजकारणाचा आखाडा, असा आहे इम्रान खान यांचा प्रवास... By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 02:47 PM 2022-04-03T14:47:59+5:30 2022-04-03T14:51:16+5:30
Pakistan PM Imran Khan: पाकिस्तानमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज मतदान होणार होते, परंतु संसदेच्या उपसभापतींनी परकीय षड्यंत्राचा आरोप करत प्रस्ताव फेटाळून लावला आहे. यानंतर आता इम्रान खान काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. इस्लामाबाद: भारताचा शेजारील देश असलेल्या पाकिस्तानमध्ये राजकारण तापले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज मतदान होणार होते, परंतु संसदेच्या उपसभापतींनी परकीय षड्यंत्राचा आरोप करत प्रस्ताव फेटाळून लावला. क्रिकेटच्या मैदानातून सुरुवात करुन आज ते राजकारणाच्या आखाड्यात सर्वोच्च पदावर आहेत. जाणून घ्या, कसा होता इम्रान खान यांचा प्रवास?
क्रिकेटरमधून राजकारणी झालेले इम्रान खान नेहमीच चर्चेत असतात. मग त्यांचे वैयक्तिक आयुष्य असो वा राजकीय कारकीर्द. त्यांचा वादांशीही दीर्घकाळ संबंध आहे. पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेसाठी विरोधी पक्षांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांच्या परराष्ट्र धोरणावरही टीका झाली आहे. प्रमुख मित्र मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट पाकिस्तान (MQM-P) ने पाठिंबा काढून घेतल्याने इम्रान खान सरकार अल्पमतात आले आहे.
इम्रान खान आपली खुर्ची वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज मतदान होणार होते, पण ते रद्द करण्यात आले. या घटनाक्रमानंतर इम्रान खान यांनी सर्व विधानसभा बरखास्त करण्याचे आवाहन राष्ट्रपतींकडे केले आहे. देशात निवडणुका व्हाव्यात आणि लोकांनी सरकार निवडावे, बाहेरुन होणारी कटकारस्थाने आणि काही भ्रष्ट लोक या देशाचे भवितव्य ठरवू शकत नाही. त्यामुळे जनतेनं निवडणुकीसाठी तयार राहावे, असे इम्रान खान म्हणाले आहेत.
इम्रान खान यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1952ला लाहोरमध्ये झाला. त्यांनी उच्चभ्रू अॅचिसन कॉलेज, इंग्लंडमधील वॉर्सेस्टर येथील रॉयल ग्रामर स्कूल आणि ऑक्सफर्डच्या केबल कॉलेजमधून शिक्षण घेतले. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 1970 मध्ये इम्रान खानची पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघात निवड झाली होती. त्यानंतर ते जागतिक दर्जाचे अष्टपैलू खेळाडू बनले. 1981 मध्ये त्यांना संघाचे कर्णधारपद मिळाले. त्यांनी 1992च्या विश्वचषकात पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर इम्रान खानने आपल्या आईच्या स्मरणार्थ शौकत खानम मेमोरियल ट्रस्ट कॅन्सर हॉस्पिटल उघडले. हे रुग्णालय जगभरात मोफत कर्करोग उपचाराचे केंद्र म्हणून ओळखले जाते. इम्रान खान यांनी 1996 मध्ये तेहरिक-ए-इन्साफ पक्षाची स्थापना केली. मात्र, त्यांच्या पक्षाला निवडणुकीत चांगली कामगिरी करता आली नाही. खान यांचा 1997 मध्ये झालेल्या पहिल्या संसदीय निवडणुकीत पराभव झाला.
2002 मध्ये त्यांनी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीची जागा जिंकून सक्रीय राजकारणात प्रवेश केला. 2007 मध्ये परवेझ मुशर्रफ यांच्या लष्करप्रमुखपदी पुन्हा निवड झाल्याच्या निषेधार्थ त्यांनी इतर 80 सदस्यांसह राजीनामा दिला. 2013 च्या पाकिस्तानच्या निवडणुकीत खान यांचा पक्ष नव्याने उदयास आला.
त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी 116 जागा जिंकल्या आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्याने सत्ताधारी आघाडी स्थापन केली. इम्रान खान यांनी 18 ऑगस्ट 2018 रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. सत्तेत आल्यावर इम्रान खान यांनी राजकारण दूर ठेवले आणि गुणवत्तेच्या आधारे महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या केल्या.
त्यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान सरकारने भारतासोबत चांगले संबंध हवेत, असा आग्रह धरला. मात्र, खान यांच्या कार्यकाळात भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक बिघडले. 2019 च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 CRPF जवान शहीद झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढला आहे. त्यानंतर आता अविश्वास प्रस्ताव रद्द झाल्यानंतर इम्रान खान यांचे पुढील पाऊल काय असेल, याकडे सर्व जगाचे लक्ष लागून आहे.
इम्रान खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, त्यांनी अब्जाधीश सर जेम्स गोल्डस्मिथ यांची मुलगी जेमिमा गोल्डस्मिथशी लग्न केले. त्यांना दोन मुलगे आहेत. 2004 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर त्यांनी टीव्ही पत्रकार रेहम नय्यर खानसोबत दुसरे लग्न केले. त्यानंतर त्यांनी 2018 मध्ये बुशरा बीबीशी तिसरे लग्न केले.