आजच्या दिवशी पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या विमानाचा हवेतच स्फोट झालेला; पस्तीस वर्षांनीही रहस्यच... By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 03:45 PM 2023-08-17T15:45:24+5:30 2023-08-17T16:00:14+5:30
ज्यांनी लष्करप्रमुख पदावर बसविले, जिया उल हकने त्यांनाच फसवले. नंतर फासावरही चढवले...११ वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर स्वत:च्या जिवाची भिती वाटू लागली होती. महनीय व्यक्तींचे विमान अपघात होतात आणि नंतर ते रहस्यच बनून जातात. नेताजी सुभाषचंद्र बोस असतील की अलिकडच्या काळातील सीडीएस रावत, अशा महत्वाच्या नेत्यांचे मृत्यू त्या त्या राष्ट्राची फार मोठी हानी करून जातात. असाच एक अपघात आजच्या दिवशी पाकिस्तानात घडला होता.
ठिकाण- बहावलपूर एअरबेस, १९८८ ची ही घटना आहे. पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती जनरल झिया-उल-हक हे C-130 विमानातून इस्लामाबादला निघाले होते. त्यांच्यासोबत काही कर्मचारी अधिकारी आणि दोन अमेरिकन मुत्सद्दीही होते. दुपारी 3:46 च्या सुमारास बहावलपूरपासून १८ किमीचे अंतर कापले असताना हवेत मोठा स्फोट झाला. काही वेळातच विमान जमिनीवर पडले.
मृतदेहांच्या चिंध्या खाली पडलेल्या होत्या. त्यापैकी राष्ट्राध्यक्ष झिया-उल-हक कोण हे ओळखणे कठीण होते. त्यांच्या दातांवरून झिया यांची ओळख पटविण्यात आली. त्यांचा मृत्यू आजही रहस्य बनून राहिला आहे. अपघाताच्या दिवशी काय घडले? हे षड्यंत्र होते का? चार दशकांनंतरही काही प्रश्नांची उत्तरे का मिळाली नाहीत?
पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी जनरल झिया-उल-हक यांना लष्करप्रमुख नेमले होते. तेव्हा झिया उल हक हे फक्त तीन स्टार रँकचे जनरल होते, पण भुट्टो यांनी झिया यांना आपला विश्वासू मानून लष्करप्रमुख पदावर बसविले. झिया हे भुट्टो यांची चाप्लुसी करण्यात कमी पडत नव्हते. एकदा भुट्टो यांच्या चपलावर चहा सांडला होता, तो पुसण्यासाठी झिया लगेच खाली वाकले होते.
1976 मध्ये जेव्हा तत्कालीन लष्करप्रमुख टिक्का खान निवृत्त झाले तेव्हा भुट्टो यांनी लष्कराची कमान झिया यांच्याकडे सोपवली, पण झिया-उल-हक यांच्या मनात वेगळेच शिजत होते. 5 जुलै 1977 रोजी त्यांनी ऑपरेशन फेअर प्ले सुरू केले. यामध्ये त्यांनी भुट्टो यांचे सरकार उलथवून मार्शल लॉ लागू केला. सप्टेंबर 1978 मध्ये ते स्वतः अध्यक्षपदावर बसले.
भुट्टो यांना सत्तेवरून हटवल्यानंतर लगेच तुरुंगात डांबले गेले. दोन वर्षांतच त्यांनी भुट्टोंना हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून फाशी दिली. सत्तापालटानंतर झिया हे विमान अपघातात मृत्यूपर्यंत सत्तेवर राहिले. जवळपास ११ वर्षे त्यांनी हुकुमशाही केली.
मात्र यानंतर त्यांना जवळचे लोकच त्यांच्या जीवाचे शत्रू बनले आहेत, याची जाणीव झाली. ते सावलीलाही घाबरू लागले होते. राष्ट्रपती आणि लष्करप्रमुख म्हणून ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, त्या त्या घरातून पार पाडू लागले होते. झिया यांना अनुचित घटनेची भीती वाटत होती, त्यामुळे त्यांना १४ ऑगस्टला आर्मी हाऊसच्या आवारातच कार्यक्रम करायचा होता.
तेथील झाडांकडे बघून त्यांना वाटले की त्यामागे उभे राहिल्यास शत्रू गोळीबार करू शकतो. यामुळे त्यांनी 30 ते 40 झाडे तोडण्याचे आदेश दिले होते. खरे तर 17 ऑगस्ट 1988 रोजी राष्ट्राध्यक्ष झिया-उल-हक बहावलपूरमध्ये येणार नव्हते. परंतु लष्कराच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर तेथे जाण्यासाठी दबाव टाकला.
तेव्हा अमेरिका पाकिस्तानी लष्कराला एमआय अब्राम्स टॅंक विकण्याचा प्रयत्न करत होती. यासाठी त्यांना बोलविण्यात आले होते. हवामान स्वच्छ होते, परंतु अमेरिकन रणगाडे वारंवार आपले लक्ष्य चुकवत होते. अखेर रणगाड्याची चाचणी पूर्ण झाली आणि सर्वांनी एअरबेस सोडले.
दोन अमेरिकन मुत्सद्दी आणि पाकिस्तानचे 29 उच्च लष्करी अधिकारी झिया-उल-हक यांच्यासह बहावलपूर लष्करी तळावर उभ्या असलेल्या C-130 मध्ये गेले. विमानाने उड्डाण केल्यानंतर पाच मिनिटांनी बहावलपूरच्या कंट्रोल टॉवरने विमान उडवत असलेले विंग कमांडर मशुद हसन यांना एक नित्याचा प्रश्न विचारला – तुमची स्थिती सांगा.
मशुदने उत्तर दिले, सी-१३० स्टँड बाय. यानंतर मसूदचा आवाज आला नाही. कंट्रोल टॉवरने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीही झाले नाही. अशाप्रकारे पाकिस्तानच्या राष्ट्रपतींचे विमान उड्डाणानंतर अवघ्या पाच मिनिटांतच बेपत्ता झाले.
एअरबेसपासून सुमारे 18 किमी अंतरावर काही गावकऱ्यांना आकाशात आगीच्या गोळ्यासारखे काहीतरी खाली पडताना दिसले. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते विमान रोलर कोस्टरप्रमाणे हवेत फिरत होते. तिसऱ्यांदा फिरल्यानंतर विमान थेट वाळवंटी भागात पडले.
त्याच सुमारास पाकिस्तानी लष्कराचे लेफ्टनंट जनरल मिर्झा अस्लम बेग यांच्या बहावलपूर तळावरून छोट्या टर्बो जेटने उड्डाण केले. काही मिनिटांत ते झिया यांचे विमान जळत होते तिथे पोहोचले, एक घिरटी घालून त्यांनी पायलटला इस्लामाबादला जाण्याचे आदेश दिले.