Imran Khan Pakistan : इम्रान खान यांची रॅली झाली हिंसक, समर्थकांनी मेट्रो स्टेशन पेटवलं; इस्लामाबादेत लष्कर उतरलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 08:49 AM2022-05-26T08:49:04+5:302022-05-26T09:00:09+5:30

Imran Khan Pakistan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी ‘आझादी मार्च’ काढला. यामध्ये त्यांचे हजारो समर्थकही सहभागी झाले होते.

पाकिस्तानमध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर आता परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडत असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या मागणीसाठी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आपल्या समर्थकांसह इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहेत. इम्रान खानच् यांच्या या ‘आजादी मार्च’ या रॅलीला रोखण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्करही तैनात केले आहे.

आंदोलक आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाल्याचेही माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर, हिंसक झालेल्या इम्रान खान यांच्या समर्थकांनी चायना चौक येथील मेट्रो स्टेशनही पेटवून दिल्याचं वृत्त पाकिस्तानातील समा न्यूजनं दिलं आहे.

दरम्यान, इस्लामाबाद येथे पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्ते आणि पोलिसांच्यामध्ये बाचाबाची झाली. यानंतर अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. बिघडलेली परिस्थिती पाहता पाकिस्तान सरकारनं लष्कराला शहरात तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.

इम्रान खान यांनी देशात लवकर निवडणुका लागू करण्यासाठी ‘आजादी मार्च’ची घोषणा केली होती. परंतु या रॅलीत सहभागी झालेले कार्यकर्ते हिंसक झाल्याचंही पाहायला मिळालं. काही आंदोलकांनी इस्लामाबादमध्ये गाड्यांना आग लावली, तर झाडंही जाळली.

इम्रान खान यांच्या समर्थकांना डी चौक, इस्लामाबादकडे जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. यानंतर पोलीस आणि पीटीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचीही माहिती समोर आली.

इम्रान खान यांनी या रॅलीला समर्थन करण्यास सांगत पाकिस्तानातील लोकांना रस्त्यावर उतरून विरोध दाखवण्याचं आवाहन केलं आहे. तसंच महिला आणि मुलांनादेखील बाहेर येऊन विरोध करण्याचं आवाहन त्यांनी केलं. डी चौकवर रात्री अडीच वाजल्यापासून गोळीबार सुरू आहे. इम्रान खान येण्यापूर्वी ते किती राऊंड फायरिंग करतील हे माहित नाही, अशी प्रतिक्रिया पंजाब प्रांताचे सीनेटर एओन अब्बास बुप्पी यांनी दिली.

इस्लामाबादमध्ये बिघडणारी परिस्थिती पाहता पाकिस्तानच्या संविधानाच्या कलम २४५ नुसार पाकिस्तानात लष्कर तैनात केलं जात आहे, अशी माहिती पाकिस्तानातील मंत्री राणा सनाऊल्लाह यांनी ट्विटरद्वारे दिली. सरकरानं महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा करण्यासाठी लष्कराला रेड झोनमध्ये तैनात केल्याचंही त्यांनी सांगितलं.