भारताच्या Rafaleचा सामना करण्यासाठी पाकची मोठी तयारी, या बड्या देशाकडून केली J-10C फायटर जेटची खरेदी! By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 01:36 PM 2022-03-12T13:36:13+5:30 2022-03-12T13:44:00+5:30
ही लढाऊ विमाने शुक्रवारी पाकिस्तानी हवाई दलात सामील करण्यात आली. भारताचे लढाऊ विमान राफेलचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने J-10C लढाऊ विमाने खरेदी केल्याचे बोलले जात आहे... पाकिस्तानने (Pakistan) आपल्या हवाई दलात (Air Force) J-10C फायटर जेटचा (J-10C Fighter Jet) समावेश केला आहे, यामुळे त्यांची लष्करी ताकद वाढणार आहे. भारताचे लढाऊ विमान राफेलचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने J-10C लढाऊ विमाने खरेदी केल्याचे बोलले जात आहे.
पाकिस्तानच्या हवाई दलात जे-10सीचा समावेश - खरे तर पाकिस्तानने नेमके किती J-10C लढाऊ विमानं विकत घेतली, हे अद्याप समजू शकलेले नाही. ही लढाऊ विमाने शुक्रवारी पाकिस्तानी हवाई दलात सामील करण्यात आली. या निमित्ताने, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंजाबमधील एटोक जिल्ह्यातील हवाई दलाचे तळ मिनहास कामरा येथे एका कार्यक्रमाला संबोधित केले.
दुर्दैवाने प्रदेशात असंतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न - भारताने फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमानांची खरेदीकडे केली आहे. भारताच्या या खरेदीकडे, नाव न घेता लक्ष वेधत इम्रान म्हणाले, "दुर्दैवाने या प्रदेशात असंतुलन निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आज आपल्या संरक्षण व्यवस्थेत एक मोठी वाढ करण्यात आली आहे.
चीनकडून करण्यात आली खरेदी - पाकिस्तानने ही लाढाऊ विमाने (Fighter Jets) चीन (China)कडून खरेदी केले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, जवळपास 40 वर्षांनंतरची ही पाकिस्तानसाठीची सर्वात मोठी उपलब्धी आहे. यापूर्वी, अमेरिकेने दिलेली F-16 लढाऊ विमाने पाकिस्तानी हवाई दलात सामील करण्यात आली होती.
चीन केवळ 8 महिन्यांत तयार करून दिली ही लढाऊ विमानं - पंतप्रधान इम्रान खान यांनी जवळपास आठ महिन्यांहूनही कमी काळात विमान उपलब्ध करून दिल्याबद्दल चीनचे आभारही मानले आहेत. महत्वाचे म्हणजे, आधुनिक लढाऊ विमान मिळण्यासाठी अनेक वर्षं लागतात.
इम्रान खान म्हणाले, आता पाकिस्तानकडे आक्रमकतेने पाऊल टाकण्यापूर्वी कुठल्याही देशाला दोन वेळा विचार करावा लागेल. पाकिस्तानी सैन्य कुठल्याही प्रकारच्या संकटाचा सामना करण्यास तयार आहे.
पाकिस्तानच्या हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल जहीर अहमद बाबर सिद्धू म्हणाले, जे-10सीचा समावेश करण्यात आल्याने हवाई दलाची शक्ती आणखी वाढेल. जे-10सी 4.5व्या पीढीतील लढाकू विमान आहे..
तसेच हे विमान चीन आणि पाकिस्तानने संयुक्तपणे विकसित केलेल्या आणि पाकिस्तान वापरत असलेल्या जेएफ-17 या लढाऊ विमानाच्या तुलनेत खूप अधिक शक्तिशाली आहे, असेही सिद्धू म्हणाले.