पहिले मदतीचा हात, आता चर्चेसाठी तयार, पण...; पाकिस्तानच्या धोरणांत अचानक झाला बदल By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 05:57 PM 2021-04-26T17:57:43+5:30 2021-04-26T18:05:28+5:30
चर्चेसाठी तयार असल्याचं म्हणत पाकिस्ताननं घातली मोठी अट पुलवामा हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील औपचारिक चर्चा बंद झाली आहे.
जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला चालना देत राहिल तोपर्यंत पाकिस्तानशी चर्चा करणे शक्य होणार नाही असं भारतानं स्पष्ट केलं आहे.
आतापर्यंत पाकिस्ताननंही चर्चेच्या विरोधातच वक्तव्य केलं होतं. परंतु गेल्या काही महिन्यांपासून अचानक पाकिस्तानच्या रणनितीमध्ये मोठे बदल झाल्याचं दिसून येत आहे.
सतत युद्धाच्या धमक्या देणाऱ्या पाकिस्ताननं भारतासोबत चर्चा करण्यास आपण तयार असल्याचंही म्हटलं आहे.
चर्चेच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील मतभेद दूर करण्यासाठी आपण तयार असल्याचं वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी केलं.
पाकिस्ताननं चर्चेबाबत म्हटलं असलं तरी त्यांनी पुन्हा एकदा त्यासोबत एक अट घातली आहे.
५ ऑगस्ट २०१९ च्या आपल्या निर्णयावर भारत जर पुन्हा विचार करणार असेल तर पाकिस्तान भारतासोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं कुरैशी म्हणाले.
या दिवशी भारतानं जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० हटवत केंद्र शासित प्रदेश बनवला होता.
कुरैशी सध्या तुर्कस्थानच्या दौर्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी एका मुलाखतीत हे विधान केलं आहे.
"जर भारत ५ ऑगस्ट २०१९ रोजीच्या आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास तयार असेल तर पाकिस्तानला त्यांच्याशी चर्चेच्या माध्यमातून समस्या सोडवण्यास खूप आनंद होईल," असं ते म्हणाले.
पाकिस्तानने अनेकदा भारताशी युद्धाची धमकी दिली आहे. तथापि, मुलाखतीदरम्यान कुरैशींचा सूर पूर्णपणे बदलला होता.
"आम्ही युद्धाची जोखीम उचलू शकत नाही. हे दोन्ही बाजूंसाठी आत्मघाती ठरेल आणि कोणतीही शहाणा व्यक्ती युद्धाची बाजू घेणार नाही. म्हणून आम्हाला एकत्र बसून चर्चा करण्याची गरज आहे," असंही ते म्हणाले.
दरम्यान, पाकिस्तान नाही, तर भारत चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप कुरैशी यांनी केला.
तसंच ५ ऑगस्ट २०१९ रोजी भारतानं घेतलेला निर्णय हा आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांच्या विरोधातील असल्याचं कुरैशी म्हणाले.
यापूर्वी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं भारताला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती.