पाकिस्तानी सैन्य, ISI अन् पंजाबी...: BLA बंडखोरांचं ट्रेन 'हायजॅक'मागील कनेक्शन समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 18:21 IST2025-03-11T18:15:28+5:302025-03-11T18:21:58+5:30

Jaffar Express Train Hijack: बंधकांमधून महिला, मुले आणि बलूचच्या प्रवाशांची सुटका केली आहे. परदेशी नागरिकांनाही सोडण्यात आल्याचे बीएलएकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात मंगळवारी जाफर एक्सप्रेस नावाची ट्रेन हायजॅक केल्यानं जगात खळबळ माजली आहे. या ट्रेनमधील ५०० प्रवाशांना बंधक बनवण्यात आलं असून ही ट्रेन बलूचिस्तान प्रांतातीतल क्वेटाहून खैबर पख्तूनख्वाच्या पेशावर दिशेने जात असताना तिच्यावर हल्ला करण्यात आला.

या ट्रेनवर शस्त्रधारी लोकांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यात ट्रेनचा ड्रायव्हर जखमी झाला, पाकच्या सुरक्षा दलातील ६ जवानही या हल्ल्यात ठार झाले. ट्रेन थांबल्यानंतर सर्व शस्त्रधारी लोक आत चढले आणि ट्रेनचा ताबा घेतला. बलूचिस्तान लिबरेशन आर्मीकडून पंजाबी आणि पाकिस्तानी सैन्याशी निगडीत लोकांना टार्गेट करण्यात आले आहे.

या हायजॅकमागे पंजाबी आणि पाक सैन्यातील लोक ट्रेनमध्ये असल्याचं कारण असू शकते. बीएलएच्या सैनिकांनी सिब्बीजवळील टनल ८ त्यांच्या नियंत्रणात घेतले आहे. बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने याबाबत अधिकृतपणे निवेदन देत ट्रेन आमच्या ताब्यात असल्याचं जाहीर केले आहे.

ज्याठिकाणी ही ट्रेन रोखण्यात आली तो डोंगराळ आणि अतिशय दुर्गम भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी पोहचणे आणि ऑपरेशन चालवणं पाकिस्तानी सैन्यासाठी मोठं आव्हान आहे. या घटनेमुळे पाकिस्तानचं शहबाज सरकार आणि सैन्य हादरलं आहे.

बलूचिस्तान लिबरेशन आर्मीच्या टार्गेटवर पाक सेना आणि पंजाबी - पाकिस्तानी मिडिया रिपोर्टनुसार, बलूचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहीद रिंद यांनी सांगितले की, ११ डब्याची जाफर एक्सप्रेसवर झालेल्या गोळीबारामुळे ट्रेनमधील ५०० प्रवासी दहशतीत आहे.

या घटनेनंतर क्वेटा आणि आसपासच्या रुग्णालयात इमरजेन्सी घोषित केली आहे. कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाकिस्तानी सरकार तयारी करत असल्याचं समोर आले आहे.

बीएलएकडून जारी निवेदनात दावा केलाय की, आमच्याकडे बहुतांश बंधक पाकिस्तानी सैन्य आणि सरकारचे कर्मचारी आहेत. पंजाबच्या लोकांनाही बंधक बनवण्यात आले आहे. बंधकांमध्ये पाकिस्तानी सैन्य, पोलीस, दहशतवाद विरोथी पथक, इंटर सर्विसेज इंटेलिजेंसचे अनेक कर्मचारी आहेत. हे सर्व सुट्टीवर पंजाबला चालले होते असा दावा बीएलएने केला आहे.

त्याशिवाय बंधकांमधून महिला, मुले आणि बलूचच्या प्रवाशांची सुटका केली आहे. परदेशी नागरिकांनाही सोडण्यात आल्याचे बीएलएकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. केवळ पाकिस्तानी सैन्य आणि सरकारचे कर्मचारी आणि पंजाबी लोकांना बंधक बनवण्यात आले आहे.

ट्रेनमध्ये मोठ्या संख्येने पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तचर यंत्रणेचे लोक प्रवास करत होते, हेच ट्रेन हायजॅकचं प्रमुख कारण आहे. ट्रेनमध्ये पंजाबचे लोक, ISI आणि पाक सैन्याचे लोक आहेत हे आधीच बीएलएला माहिती होते. दीर्घकाळापासून बीएलए पाक सैन्यावर हल्ला करत आहे. याआधीही पाक सैनिकांवर हल्ले झाले होते.

नुकतेच कोळसा खाणीतील कामगारांना घेऊन जात असलेल्या पाकिस्तानी वाहनाला लक्ष्य करण्यात आले होते. या स्फोटामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला तर इतर काही जण जखमी झाले होते आहेत. या परिसरात याआधीही स्फोटाच्या अशा घटना घडल्या आहेत.