pia to bring back its plane from malaysia soon pakistan minister international court
विमान जप्त झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची नाचक्की; नाईलाजानं उचलावं लागलं 'हे' पाऊल By जयदीप दाभोळकर | Published: January 25, 2021 01:58 PM2021-01-25T13:58:38+5:302021-01-25T14:08:56+5:30Join usJoin usNext गेल्या आठवड्यात मलेशियानं पाकिस्तानंचं प्रवासी विमान बोईंग ७७७ जप्त केलं होतं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तानची नाचक्की झाली होती. पाकिस्ताननं व्हिएतनामची कंपनी पेरेग्रीन एव्हिएशन चार्ली लिमिटेडकडून हे विमान भाडेतत्त्वावर घेतलं होतं. परंतु याची रक्कम न चुकवल्याप्रकरणी जप्तीची कारवाई करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर यानंतर अपमान झालेल्या पाकिस्ताननं आता भाडेतत्त्वाची रक्कम चुकवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सनं पेरेग्रीन एव्हिएशन चार्ली लिमिडेटसोबत न्यायालयाच्या बाहेरच तडजोड केली आहे. पाकिस्तानचे नागरी उड्डाण मंत्री गुलाम सरवर खान यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे. या विमानावरील वादावरून लंडन न्यायालयात होणाऱ्या पुढील सुनावणीदरम्यान हा वाद सोडवला जाईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. पाकिस्तान इंटरनॅशन एअरलाईन्सनं भाडेतत्त्वावर घेतलेल्या विमानाच्या देखभालीसाठी लागलेली १.४ कोटी डॉलर्स इतकी रक्कम पाकिस्ताननं चुकवली नाही. मलेशियाच्या न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर हे विमान क्वालालंपूर विमानतळावर जप्त करण्यात आलं होतं. त्यावेळी विमानात तब्बल १७२ प्रवासी आणि विमानातील कर्मचारीदेखील होते. यानंतर मलेशियामध्ये अडकलेल्या प्रवाशांना युएई आणि कतारच्या विमानांमधून इस्लामाबादमध्ये आणण्यात आलं. पाकिस्तान इंटरनॅशन एअरलाईन्स आणि पाकिस्तानी दुतावासातील कर्मचाऱ्यांनी आपल्या खाण्यापिण्याचीही व्यवस्था केली नव्हती. आपल्याला दोन दिवस क्वालालंपूर विमानतळावरच झोपावं लागल्याचा दावा काही प्रवाशांनी केला. कोरोनाच्या महासाथीमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम चुकवता आली नसल्याचं यापूर्वी पाकिस्ताननं म्हटलं होतं. तसंच मलेशियाच्या न्यायालयानं पाकिस्तान इंटरनॅशन एअरलाईन्सचं म्हणणं न ऐकताच एकतर्फी निर्णय दिल्याचा आरोपही पाकिस्ताननं केला होता. त्यामुळेच प्रवाशांनाही नाहक त्रास सोसावा लागल्याचं पाकिस्ताननं म्हटलं. रक्कम चुकवल्यानंतर बोईंग ७७७ पाकिस्तानात येईल असे संकेत पाकिस्तानच्या मंत्र्यांनी दिले. तसच भाडेतत्त्वावर मोठी रक्कम देऊन हे विमान घेतल्याप्रकरणी त्यांनी यापूर्वीच सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं. यापूर्वी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या अनेक वैमानिकांकडे बनावट परवाने असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अनेक देशांनीही पाकिस्तानी वैमानिकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्या सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटिनंदेखील विमान कंपनीच्या बेजबाबदार वर्तणुकीवरून फटकारलं होतं. बोईंग ७७७ या विमानाचं प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रलंबित असताना आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी त्यांना परवानगी कशी दिली? तसंच आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन केल्याप्रकरणी देशाचा अवमान होईल याची माहिती कंपनीला नव्हती का? असा प्रश्नही कंपनीला करण्यात आला. टॅग्स :पाकिस्तानइम्रान खानमलेशियाविएतनामविमानविमानतळPakistanImran KhanMalaysiaVietnamairplaneAirport