Piranha Fish Attack: भयानक रूप, करवतीच्या पात्यासारखे दात, किनाऱ्यावर नरभक्षक पिरान्हा माशाचा धुमाकूळ, हल्ल्यात ४ जणांचा मृत्यू, २० जण जखमी By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 08:36 PM 2022-01-06T20:36:40+5:30 2022-01-06T20:39:21+5:30
Piranha Fish Attack: दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे या देशात पिरान्हा या नरभक्षक माशाने केलेल्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी झाले आहेत. पाण्यात राहून माशाशी वैर करू नये, असं म्हटलं जातं. मात्र या पाण्यात असा एक नरभक्षक मासा राहतो. ज्याच्या तावडीत माणूस सापडला तर त्याची हाडंसुद्धा शिल्लक राहत नाहीत. अशाच या नरभक्षक माशाच्या धुमाकूळाची एक घटना समोर आली आहे.
दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे या देशात पिरान्हा या नरभक्षक माशाने केलेल्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी झाले आहेत. पिरान्हा माशांच्या या हल्ल्यामुळे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
डेली स्टारच्या दाव्यानुसार एक २२ वर्षीय तरुण बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी बीचवर त्याचा शोध घेतला. मात्र तो भेटला नाही. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर काही काळातच या तरुणाचा मृतदेह खूप वाईट अवस्थेत किनाऱ्यावर सापडला. सदर तरुण पॅराग्वे नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी गेला होता. फॉरेन्सिक टीमनेही या तरुणावर पिरान्हा माशाने हल्ला केल्याला दुजोरा दिला आहे.
पिरान्हा मासे आक्रमक होण्याच्या घटना फारच कमीवेळा घडतात. मात्र या भागात अशा प्रकारच्या घटना समोर आलेल्या आहेत. यापूर्वी एका ४९ वर्षांच्या एका व्यक्तीलाही पॅराग्वे नदीत अशाच प्रकारे मृतावस्थेत पाहण्यात आले होते. त्याच्या शरीरावर चावल्याच्या खुणा आढळल्या होत्या. त्यानंतर पिरान्हा मासे माणसांपासून दूर राहावेत, यासाठी पाण्यात केमिकल टाकण्याचा विचार केला जात आहे.
बायोलॉजिस्ट ज्युलिओ झेव्हियर यांनी ABC.com.py ला सांगितले की, प्रजननाचा काळ सुरू असतो तेव्हा पिरान्हा मासे आक्रमक होतात आणि हल्ला करतात. बहुतांश नर पिरान्हा मासे हे हल्लेखोर होतात. ते हल्ला करण्यापूर्वी लपून राहतात.