plane crash: बिघाड होऊन विमान कोसळले, घरावर आदळले, आईला भेटायला जात असलेल्या उद्योगपतीचा कुटुंबीयांसह मृत्यू By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 11:31 AM 2021-10-05T11:31:56+5:30 2021-10-05T11:36:30+5:30
plane crash: रोमानियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेले शुमार पेट्रेस्कू आणि त्यांच्या कुटुंबीयांचा एका भीषण विमान अपघातात मृत्यू झाला आहे. रोमानियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेले शुमार पेट्रेस्कू आणि त्यांच्या कुटुंबीयांचा एका भीषण विमान अपघातात मृत्यू झाला आहे. रिपोर्टनुसार ते त्यांचा ३० वर्षीय मुलगा डेन स्टिफन पेट्रेस्कू, पत्नी रेजिना पेस्ट्रेस्कू आणि कुटुंबातील मित्रांसह ते आईला भेटण्यासाठी जात होते.
पेट्रेस्कू हे मुळचे इटालियन व्यापारी होते. तर त्यांची पत्नी आणि आई फ्रेंच वंशाची होती. विमानामध्ये त्यांच्या मुलाचा ३६ वर्षीय कॅनेडियन मित्र ज्युलियन ब्रोसार्ड हासुद्धा उपस्थित होता. त्यांचे विमान पेट्रेस्कू यांच्या ९८ वर्षीय आईला भेटण्यासाठी सार्डिनिया बेटावरून जात होते.
इटालियन मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार चर्चित व्यावसायिक पेट्रेस्कू एका मुख्य बांधकाम फर्मचे नेतृत्व करत होते. तसेच अनेक हायपरमार्केट आमि मॉलचे मालक होते. त्यांच्याजवळ जर्मनीचे नागरिकत्वही होते. रोमानियन वृत्तपत्र एडवरूलच्या वृत्तानुसार पेट्रेस्कू यांची एकूण संपत्ती ३ बिलियन युरोपेक्षा अधिक होती.
विमान क्रॅश होऊन एका एका घरावर आदळल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. मात्र विमानातील पायलट आणि प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. प्रत्यक्षदर्शींनी या अपघाताबाबत सांगितले की, जेव्हा विमान आकाशातून खाली कोसळले आणि घरावर आदळले तेव्हा आगीचा एक भयानक गोळा आणि धुराचे लोट वर उठलेले दिसले.
१९ वर्षीय अँड्रिया नावाच्या एका तरुणीने स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले की, विमान अनियंत्रित झाल्याचे आणि खाली कोसळून अपघातग्रस्त झाल्याचे मी पाहिले. विमान खाली पडले होते आणि धूर आणि आगीचे लोळ वर उठत होते. खाली कोसळल्यानंतर विमानाचे तुकडे तुकडे झाले, ते दृश्य पाहून मी खूप घाबरले.
आणीबाणी सेवा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, विमान खाली कोसळल्यानंतर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक गाड्यांना आग लागली. मात्र त्यावेळी ही वाहने रिकामी होती. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही.
ज्या विमानाच्या अपघातामुळे व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबाचा मृत्यू झाला ते पिलाटस पीसी-१२ सिंगल इंजिन असलेले विमान होते. या विमानाने स्थानिक वेळेनुसार दुपारी १ वाजून ४ मिनिटांनी लिनेट विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवरून उड्डाण केले होते. मात्र ११ मिनिटांतच ते अपघातग्रस्त झाले.
मिलान फायर ब्रिगेडचे कार्लो कार्डिनली यांनी सांगितले की, विमान खूप वेगाने येऊन इमारतीवर आदळले. पायलटने एक वळण घेतले. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे तो वाचू शकला नाही. दुर्घटनास्थळावरून काळ्या धुराचा लोट वर उठताना दिसला. विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच अपघाताचा तपास सुरू झाला आहे.