2300 वर्षे जुने बोधीवृक्ष, सम्राट अशोकाशी संबंध; श्रीलंकेतील मंदिरात PM मोदींनी घेतले दर्शन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 15:19 IST2025-04-06T14:57:58+5:302025-04-06T15:19:07+5:30

PM Narendra Modi Sri Lanka : पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेले आहेत.

PM Narendra Modi Sri Lanka : पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेच्या अधिकृत दौऱ्यावर गेले आहेत. श्रीलंकेत दाखल झाल्यानंतर त्यांनी रामनवमीच्या निमित्ताने अनुराधापुरा या ऐतिहासिक शहराला भेट दिली आणि जय श्रीमहा बोधी मंदिरात प्रार्थना केली.

यावेळी पंतप्रधान मोदींना श्रीलंकेच्या हवाई दलाकडून गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. पंतप्रधान मोदींचे अनुराधापुरात आगमन झाल्यानंतर राष्ट्रपती दिसानायके यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी या भेटीचे क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या पवित्र ठिकाणी त्यांच्यासोबत श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायकेदेखीलउपस्थित होते. मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी पंतप्रधान मोदींचे रक्षासूत्र बांधून स्वागत केले. हे मंदिर भारत आणि श्रीलंका यांच्यातील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंधांचे प्रतीक मानले जाते.

विशेष म्हणजे, जय श्री महा बोधी मंदिरात असलेले बोधीवृक्ष सुमारे 2300 वर्षे जुने आहे. असे मानले जाते की, सम्राट अशोकांची मुलगी थेरी संघमित्रा हिने हे झाड भारतातून श्रीलंकेत आणले होते.

ज्या बोधीवृक्षाखाली गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले, त्याच बोधीवृक्षाच्या दक्षिणेकडील फांदीपासून या वनस्पतीची उत्पत्ती झाली आहे. हे झाड श्रीलंकेचा राजा देवनमपिया टिस्सा यांनी इ.पू. 288 मध्ये त्यांच्या शाही बागेत लावले होते.

जय श्री महा बोधी वृक्षाला बौद्ध धर्मात अत्यंत पूजनीय मानले जाते. हा बुद्धाचा जिवंत आणि अस्सल दुवा मानला जातो. शतकानुशतके बौद्ध भक्त या झाडाखाली येऊन प्रार्थना करतात. असे मानले जाते की या झाडाचे दर्शन आणि पूजा केल्याने मुले जन्माला येतात, चांगली कापणी होते आणि मनोकामना पूर्ण होतात.

मोदी आणि दिसानायके यांनी अनुराधापुरामध्ये रेल्वे कनेक्टिव्हिटीशी संबंधित दोन प्रकल्पांचे संयुक्तपणे उद्घाटनही केले. यामध्ये महो अनुराधापुरा रेल्वे विभागात महो ओमंथाई लाईनचे अपग्रेड आणि आधुनिक सिग्नलिंग सिस्टीमचा समावेश आहे. हे प्रकल्प भारताच्या मदतीने पूर्ण झाले आहेत.