चीनची धमकी! आता अमेरिकेने परिणाम भोगायला तयार रहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 08:11 PM2020-05-20T20:11:13+5:302020-05-20T20:28:43+5:30

तैवानच्या मुद्द्यावरून चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी, अमेरिकेने परिणाम भोगण्यासाठी तयार रहावे, अशी धमकी दिली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो यांनी ट्विट करून तैवानच्या राष्ट्रपती साई इंग वेन यांना दुसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावरूनच चीनने अमेरिकेला धमकी दिली आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, की अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो यांनी तैवान भागातील स्थिरता आणि शांतते बरोबरच अमेरिका-चीन संबंधांनाही मोठा तडा दिला आहे. चीन या विरोधात निश्चितपणे आवश्यक ती कारवाई करेल. अमेरिकेला याचा परिणाम निश्चितपणे भोगावा लागेल.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो यांनी मंगळवारी ट्विट केले होते, "तैवानच्या राष्ट्रपती म्हणून दुसऱ्या कार्यकाळासाठी डॉ. साई इंग वेन यांना शुभेच्छा. तैवानची बहरणारी लोकशाही संपूर्ण जग आणि संबंधित भागासाठी प्रेरणा आहे. राष्ट्रपती साईंच्या नेतृत्वात तैवानसोबत असलेले आमचे संबंध अधिक चांगले होतील."

चीन 1949चे गृह युद्ध संपल्यापासूनच तैवानवर दावा सांगतो. एकीकडे तैवान स्वतःला स्वतंत्र आणि सार्वभौम मानतो, तर दुसरीकडे, चीन हाँगकाँग प्रमाणे तैवानमध्ये 'एक देश, दोन व्यवस्था' लागू करू इच्छितो. एवढेच नाही, तर आवश्यक वाटल्यास चीन बळाचा वापर करूनही तैवानवर कब्जा करू शकतो. यामुळेच, कुणी तैवानचे समर्थन केले, की चीन त्याला धमकावतो.

साई इंग वेन या तैवानकडे एक सार्वभौम देश म्हणून पाहतात. तसेच तैवान हा 'वन चायना'चा भाग नाही, असेही त्या म्हणतात. त्या म्हणाल्या, "ज्यात तैवानचे स्टेटस कमी केले जाईल, अशा, 'एक देश, दोन व्यवस्था', या नावावर आम्ही चीनचे अधिपत्य स्वीकारणार नाही.

शपथविधीनंतर दिलेल्या भाषण साई म्हणाल्या, आम्ही कब्जा आणि आक्रामकतेच्या दबावाचा यशस्वीपणे विरोध केला आहे. आपण हुकूमशाहीपासून लोकशाहीकडे वाटचाल केली आहे. एक वेळ होती, जेव्हा आपण संपूर्ण जगात वेगळे पडलो होतो. मात्र, अनेक संकटांचा सामना करत, आपण नेहमीच लोकशाही आणि स्वातंत्रत्याच्या मुल्यांचे जतन केले. साईंच्या या वक्तव्यानंतर चीनकडूनही तत्काळ प्रतिक्रिया आली, चीन म्हणाला, की ते तैवानच्या स्वातंत्र्यासाठी कसल्याही प्रकारचा वाव ठेवणार नाही.

तैवानच्या राष्ट्रपती साई इंग वेन यांनी कोरोना व्हायरस महामारीविरोधात ज्या पद्धतीने काम केले त्याचे संपूर्ण जगात कौतुक होत आहे. तर वेळेवर कोरोनासंदर्भात माहिती दिली नाही, म्हणून चीनवर संपूर्ण जग सडकून टीका करत आहे. तैवानने लॉकडाउन न करता आणि कठोर बंधने न घालताच कोरोना महामारीविरोधातील लढाई जिंकली आहे. त्यामुळे जागतीक पातळीवर त्याची स्थिती आणखी चांगली झाली आहे. तैवानमध्ये गेल्या तीन आठवड्यांत कोरोनाचा एकही रुग्ण समोर आलेला नाही.

मात्र जेव्हा, जागतीक आरोग्य संघटनेच्या वार्षिक बैठकीत, तैवानने मिळवलेले यश पाहता, पर्यवेक्षक म्हणून सहभागी करून घेण्याची मागणी झाले, तेव्हा चीनने त्याला विरोध केला होता. यावेळी चीन म्हणाला होता, की तैवानला एका देशाचा दर्जा दिला जाऊ शकत नाही.

चीन 2016पासूनच अंतरराष्ट्रीय संघटनेत तैवानच्या रस्त्यात उभा आहे. जागतीक आरोग्य संघटनेच्या सोमवारी झालेल्या बैठकीपूर्वी, तैवानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दुःख व्यक्त करत म्हटले होते, की सध्या आम्ही आमच्या दावेदारीवर भर देणार नाही.

गेल्या काही महिन्यांत तैवान आणि चीनला अलग करणाऱ्या महासागरात चीनच्या सैन्याची हालचाल वाढली आहे. या भागात चीनने सैन्याची तैनातीही वाढवली आहे. एवढेच नाही, तर तैवानला सैन्य बळाचा वापर करून चीनमध्ये सामील करून घेण्याची मागणीही बीजिंगमध्ये वाढली आहे.

विश्लेषकांच्या मते, चीन सध्या तैवानवर हल्ला करणार नाही. मात्र, बीजिंग माध्यमे चीनच्या सैन्य ताकदीचा सातत्याने उल्लेख करत असतात. चीन सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने एका संपादकीय मध्ये लिहिले आहे, की तैवानचा निर्णय अखेर शक्तीच्या प्रतिस्पर्धेवरच होईल.

साई यांच्या चीनच्या अधिपत्यासंदर्भातील वक्तव्यानंतर काही तासांतच, चीनच्या तैवानसंदर्भातील विभागाने म्हटले आहे, की बिजिंग दोन्हीकडच्याही लोकांसमवेत विकासासाठी काम करत राहील. मात्र, तैवानला चीनपासून वेगळे करणाऱ्या कुठल्याही कारवाईला खपवून घेणार नाही.

साई इंग-वेन यांनी चीनसोबत चर्चेचाही प्रस्ताव ठेवला आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना अपील केली, की त्या तनाव कमी करण्यासाठी त्यांच्या सोबतीने काम करतील. त्या म्हणाल्या, "मतभेद संपवून सहअस्तित्वाचा मार्ग शोधणे, ही दोन्ही पक्षांची जबाबदारी आहे."