ब्रुनेईमध्ये नरेंद्र मोदी जी मशीद पाहण्यासाठी पोहोचले, तिची खासियत काय? जाणून घ्या....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 09:01 AM2024-09-04T09:01:07+5:302024-09-04T09:16:51+5:30

नरेंद्र मोदींचा ब्रुनेई दौरा खूप खास असल्याचे म्हटले जात आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय ब्रुनेई दौऱ्यावर आहेत. मंगळवारी नरेंद्र मोदी ब्रुनेईची राजधानी बंदर सेरी बागवान येथे पोहोचले. दरम्यान, नरेंद्र मोदींचा ब्रुनेई दौरा खूप खास असल्याचे म्हटले जात आहे.

कारण, भारतीय पंतप्रधानांची ब्रुनेईला दिलेली ही पहिलीच भेट आहे. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना ४० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नरेंद्र मोदींनी ब्रुनेईमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले.

दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांचे प्रतीक म्हणून नरेंद्र मोदींनी उच्चायुक्तालयाचा उल्लेख केला. तसेच, याद्वारे अनिवासी भारतीयांची सेवा होईल. कोटा दगडांनी बनलेली उच्चायुक्तालयाची इमारत भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दर्शवते, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजधानीतील उमर अली सैफुद्दीन मशिदीत पोहोचले. उमर अली सैफुद्दीन मशीद ब्रुनेईच्या दोन राष्ट्रीय मशिदींपैकी एक आहे. यासह, ही ब्रुनेईचे राष्ट्रीय चिन्ह देखील आहे. ही मशीद देशातील सर्वात मोठ्या आणि जुन्या मशिदींपैकी एक आहे.

या मशिदीचे नाव उमर अली सैफुद्दीन तृतीय यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. जे ब्रुनेईचे २८ वे सुलतान आणि सध्याचे सम्राट सुलतान हसनल बोल्किया यांचे वडील होते. ही मशीद देशातील इस्लामिक श्रद्धेचे प्रतीक आहे.

या मशिदीत पोहोचल्यानंतर नरेंद्र मोदींनी स्वतः तिथले फोटो शेअर केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या मशिदीचे बांधकाम ४ फेब्रुवारी १९५४ रोजी सुरू झाले आणि जवळपास ५ वर्षांत ही मशीद पूर्ण झाली. त्यावेळी या मशिदीच्या बांधकामासाठी ११ कोटींहून अधिक खर्च आला होता.

ही मशीद मलेशियन आर्किटेक्चर फर्म बूटी एडवर्ड्स अँड पार्टनर्सने बांधली होती. मशिदीच्या बांधकामात ७०० टन स्टील आणि १५०० टन काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे. तसेच, मशिदीचा पाया ८०-१२ फूट खोल आहे.

ब्रुनेईतील या मशिदीचे उद्घाटन सुलतान उमर अली सैफुद्दीन तृतीय यांच्या ४२ व्या वाढदिवसादरम्यान १९५८ मध्ये करण्यात आले होते. या मशिदीची रचना भारतीय मुघल साम्राज्याशी मिळती-जुळती आहे.

मशीद पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. मशिदीच्या आकाराबद्दल बोलायचे तर ते ६९X२४ मीटर आहे. मशिदीत ३ हजार भाविक एकत्र बसू शकतात. मशिदीची कमाल उंची १७१ फूट असून घुमट सोन्याने मढवलेला आहे.