Recession 2022: फक्त श्रीलंका अन् बांगलादेश नव्हे, संपूर्ण जगच दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर!, 'हे' पाच मुद्दे कारणीभूत! By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 05:24 PM 2022-05-18T17:24:45+5:30 2022-05-18T17:32:02+5:30
संपूर्ण जगात पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा धोका निर्माण झाला आहे. या धोक्यामुळे अर्थतज्ज्ञांची झोप तर उडालीच आहे. पण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कही चिंताग्रस्त झाला आहे. मस्क सहीत अनेक धनाड्य व्यक्तींच्या मते अमेरिकेसारखा विकसीत देख मंदीच्या उंबरठ्यावर आहे. यासाठी अनेक मुद्दे कारणीभूत असून पुन्हा एकदा संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या संकटात सापडणं जवळपास निश्चित झालं आहे. नेमकी अशी कोणती कारणं आहेत की ज्यानं संपूर्ण जग आर्थिक संकटाच्या दिशेनं प्रवास करत आहे ते जाणून घेऊयात...
आर्थिक मंदी म्हणजे नेमकं काय? कोणत्याही एका देशाचं सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) सातत्यानं काही महिने पडलं तर आर्थिक भाषेत यास आपण आर्थिक मंदी आल्याचं म्हणू शकतो. सामान्यत: दोन तिमाही म्हणजेच सहा महिन्यांचा कालावधी यासाठी मापदंड मानण्यात येतो. जीडीपीचा विकास दर सातत्यानं खाली कोसळनं हे इकोनॉमिक स्लोडाऊन म्हणजेच आर्थिक सुस्तीचा काळ मानला जातो.
जीडीपी सातत्यानं खाली पडला तर त्यास महामंदी संबोधलं जातं. एखाद्या देशाच्या जीडीपीमध्ये १० टक्क्यांहून अधिक घट झाली तर त्यास महामंदी म्हटलं जातं. पहिल्या महायुद्धानंतर १९३० च्या दशकात सर्वात मोठी महामंदी आली होती. ज्यास The Great Depression असं म्हटलं गेलं होतं.
कोरोना महामारी २०१९ सालापासून संपूर्ण जगाला महामारीचा सामना करावा लागला. या महामारीनं जगभरात आरोग्य संकट निर्माण तर केलंच पण आर्थिक संकटही वाढलं. आताही चीन या महामारीचा सामना करत आहे. शांघाय सारखं इडस्ट्रियल हब सध्या लॉकडाऊनमध्ये आहे. याकारणामुळे जगभरातील मातब्बर कंपन्यांचे प्लांट सध्या बंद आहेत. याआधी पुरवठ्याच्या समस्यांचा सामाना संपूर्ण जग करत असताना आता नव्या लाटेनं संपूर्ण जगाला चिंतेत टाकलं आहे.
रशिया-युक्रेन युद्ध फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध अजूनही संपलेलं नाही. सुरुवातीला हे युद्ध इतकं ताणलं जाणार नाही असं वाटत होतं. पण सर्व अंदाज खोटे ठरले आणि अजूनही दोन्ही देश युद्धाच्या आगीत धुमसत आहेत. या युद्धामुळे संपूर्ण जगात काही विशिष्ट आणि महत्वाच्या वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. रशिया आणि युक्रेन गहूसह अनेक अन्नधान्याचे महत्वाचे निर्यातदार देश आहेत. या युद्धामुळे अनेक लहान देशांसमोर अन्न संकट उभं राहिलं आहे.
दशकातील सर्वाधिक महागाईचा उच्चांक महागाईचाही आगडोंब उसळला आहे. भारताबाबत बोलायचं झालं तर गेल्या महिन्यात घाऊक आणि किरोकोळ महागाईच्या दरानं उच्चांक गाठला आहे. कित्येक वर्षांनंतर एप्रिल महिन्यात घाऊक महागाईचा दर १५ टक्क्यांच्या पार पोहोचला आहे. हा आकडा १९९८ सालानंतरचा सर्वात मोठा आकडा आहे. एप्रिल महिन्यात अमेरिकेतील घाऊक महागाईचा दर ८.३ टक्क्यांवर आला असला तरी हा आकडा देखील गेल्या काही दशकांनंतर सर्वाधिक ठरला आहे.
कर्ज महागलं महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातील सेंट्रल बँकांनी व्याज दरात वाढ केली आहे. भारतात रिझर्व्ह बँकेनं या महिन्यात एमपीसीची आपत्कालीन बैठक बोलावली होती. यात रेपो रेट ०.४० टक्क्यांनी वाढवला. भारतात गेल्या दोन वर्षांपासून व्याजदर स्थिर होते. पण यंदाच्या आर्थिक वर्षात रेपो रेटमध्ये १ टक्क्यांनी वाढविण्यात येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेत देखील तिच परिस्थिती आहे. फेड्रल बँकेनं व्याज दर वाढवले आहेत.
कच्च्या तेलाच्या दरात वाढ गेल्या काही महिन्यांपासून कच्च्या तेलाचे दरही गगनाला भिडले आहेत. कच्च्या तेलाचे दर सातत्यानं १०० डॉलर प्रति बॅरलच्या वर आहेत. सध्या कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ११३.०८ डॉलर इतका झाला आहे. कच्च्या तेलाचे सर्वात मोठे निर्यातदार देशांपैकी एक असलेल्या रशियावर अमेरिका आणि युरोपिय देशांनी निर्बंध लादले आहेत. एप्रिल महिन्यात कच्च्या तेलाचं उत्पादन देखील तब्बल ९ टक्क्यांनी घटलं आहे.