रागात मशिदीत बॉम्बस्फोट घडवण्यासाठी गेला; मग असं काय घडलं? तो स्वत: मुस्लीम बनला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 12:36 PM2022-09-15T12:36:51+5:302022-09-15T12:44:35+5:30

एखाद्याच्या मनात वर्षानुवर्षे असलेल्या द्वेषाचे रूपांतर प्रेमात करण्यासाठी कदाचित एक क्षणही पुरेसा आहे. एकेकाळी इस्लामच्या नावाने चिडलेल्या एका अमेरिकन माणसासोबत असेच काहीसे घडले. नेमकं काय आहे हा प्रकार जाणून घेऊया.

या अमेरिकन व्यक्तीला मशिदीत स्फोट करून शेकडो लोकांना मृत्यूच्या दारी ढकलायचं होतं. पण अचानक असे काही घडले की केवळ मुस्लिमांबद्दलचे त्यांचे मत बदलले नाही तर तो स्वतः इस्लाम स्वीकारून मुस्लिम झाला.

ही कहानी आहे रिचर्ड मॅककिनीची, ज्यांच्यावर नुकतीच तयार झालेली डॉक्युमेंट्री चर्चेत आली आहे. रिचर्ड यांनी २५ वर्षे यूएस मरीन फोर्समध्ये काम केले आहे. नोकरीदरम्यान, मॅककिनींचा अनेक आखाती देशांमध्ये प्रवास होत होता. जेथे मॅककिनी नेहमीच मुस्लिमांना जीवघेणा शत्रू म्हणून पाहत असे.

इतकेच नाही तर अमेरिकेतील इंडियाना येथील आपल्या घरी परतल्यावरही त्यांचा द्वेष संपला नाही. मॅककिनीचा द्वेष इतका वाढला होता की स्थानिक दुकानात हिजाब घातलेली एखादी स्त्री दिसली तरी मॅककिनीला संताप अनावर व्हायचा. त्याचा द्वेष इतका झाला की त्याची पत्नी देखील त्याला सोडून गेली.

डॉक्युमेंट्रीसाठी दिलेल्या मुलाखतीत मॅककिनीने सांगितले की, इंडियानामधील मुन्सी येथे राहत असताना, जेव्हाही मी घराबाहेर पडायचो तेव्हा मला इच्छा नसतानाही मुस्लीमांना पाहावं लागायचं. हा आपला देश आणि त्याचे शहर आहे या विचाराने त्याला त्या टप्प्यावर नेले जेव्हा मॅककिनीला वाटले की आता या लोकांचे नुकसान झाले पाहिजे.

द्वेषाच्या आगीत जळत मॅककिनीने मशिदीत स्फोट घडवण्याचा कट रचला, २००९ साली शुक्रवारी मशिदीबाहेर मोठ्या संख्येने लोक जमा झाल्यामुळे मॅककिनीने शुक्रवारी स्फोट घडवण्याचा निर्णय घेतला. या स्फोटात किमान २०० लोक मारले जातील आणि जखमी होतील, असे रिचर्ड मॅककिनी यांना वाटले होते.

मात्र, मॅककिनीने असं काहीही केले नाही आणि त्यामागील कारण खरोखरच धक्कादायक आहे. सर्व काही प्लॅननुसार चाललं होते. मॅककिनी मशिदीच्या गेटमधून जात असताना आत बसलेल्या काही लोकांनी त्यांना बोलावले. तोपर्यंत मॅककिनीला हे सर्व खूनी आहे असं वाटलं

मॅककिनीला आतमध्ये आमंत्रित करणाऱ्यांमध्ये अफगाण निर्वासित डॉक्टर साबीर बहर्मी, त्यांची पत्नी बीबी बहर्मी आणि स्थानिक जोमो विल्यम्स यांचा समावेश होता. आश्चर्यकारक गोष्ट अशी होती की मॅककिनीने कल्पनेप्रमाणे काहीही घडले नाही. त्यांनी मॅककिनीला खास पाहुणे म्हणून वागवले. थोड्याच वेळात मॅककिनीला समजले की हे लोक जसे विचार करत होते तसे नव्हते.

याबाबत मॅककिनी सांगतात की, हे सर्व लोक अतिशय साधे आणि आनंदी मनाचे होते. ते सर्वजण त्यांच्या आयुष्यात आनंदी होते आणि जरी ते अमेरिकन होते. त्याच वेळी, त्या सर्वांना माझ्याशी बोलतानाही खूप आवडले. या अनुभवाने मॅककिनी यांची विचारसरणी बदलली आणि त्यानंतर ते वारंवार मशिदीत जाऊ लागले.

सुमारे आठ आठवड्यांनंतर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. त्यानंतर ते दोन वर्षे मुन्सी येथील इस्लामिक सेंटरचे अध्यक्षही होते. मशीद उडवण्याचा प्लॅन बनवण्याच्या १३ वर्षांनंतरही मॅककिनी अजूनही मुस्लिम आहे. ते आता केवळ सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत नाही, तर सामाजिक चळवळीत द्वेषविरोधी कार्यकर्ता आणि वक्ता बनले आहेत.